पालकमंत्र्यांच्या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर विशेष 'स्कॉड'
By Admin | Updated: October 17, 2016 00:14 IST2016-10-17T00:14:48+5:302016-10-17T00:14:48+5:30
अवैध दारू व्यवसायावर आळा बसवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी दहा पोलीस ठाण्यांत विशेष पथक तयार केले आहेत.

पालकमंत्र्यांच्या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर विशेष 'स्कॉड'
खोलापुरी गेट हद्दीत कारवाई : दारू विक्रेत्याला अटक
अमरावती : अवैध दारू व्यवसायावर आळा बसवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी दहा पोलीस ठाण्यांत विशेष पथक तयार केले आहेत. या पथकापैकी खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष पथकाने अवैध दारू विक्रेत्याला अटक करून पहिली धडाकेबाज कारवाई केली.
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जुगारावर धाड टाकल्यानंतर पोलीस यंत्रणा हादरून गेली. याबाबत गांभीर्याने लक्ष देत पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी आता दहाही पोलीस ठाण्यांत विशेष स्कॉड तयार केले आहे. यामध्ये बडनेरा-भातकुली, फ्रेजरपुरा- नांदगांव पेठ, गाड़गेनगर - वलगांव, नागपुरी गेट - कोतवाली आणि राजापेठ - खोलापुरी गेट या ठाण्यांना जोडण्यात आले. या पाच झोनमधील गुन्हे शाखेचे विशेष पथकात सहायक पोलीस निरीक्षक दत्ता देसाई, फिरोज खान पठाण, पोलीस उपनिरीक्षक शेख, प्रवीण पाटिल आणि प्रवीण वेरुळकर हे प्रमुख राहणार आहे. त्याचप्रमाणे दहा पोलीस ठाण्यात तयार करण्यात आलेल्या स्कॉडमध्ये बडनेऱ्याचे पोलीस उपनिरीक्षक आशिष देशमुख, वलगावचे विलास पवार, गाडगेनगरचे अनिल मुळे, राजापेठचे राहुल चव्हाण, भातकुलीचे नितीन थोरात, नांदगावचे चाटे, नागपुरी गेटचे संजय आत्राम, कोतवालीचे गोकुल ठाकूर, खोलापुरी गेटचे रवींद्र जेधे आणि फ्रेजरपुरा ठाण्यातील पथकात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठाकूर यांचा सहभाग आहे. या १५ पथकांवर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल किनगे नियंत्रण ठेवणार आहे. शनिवारी सायंकाळी खोलापुरी गेट हद्दीत सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे यांच्या पथकाने भाजीबाजारात गस्त घातली. दरम्यान मोहन जयस्वाल यांच्या दारूच्या दुकानातून विना परवाना दारूचा माल घेऊन जाणाऱ्या शहीद खा शेर खा पठाण (५०,रा. लालखडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी दारूच्या २० बॉटला पोलिसांनी जप्त करून कलम ६५(ई) दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंदविला. सोबतच दारू दुकानातून बॉटल विक्री करणाऱ्या विजय रमेश देवरणकर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. (प्रतिनिधी)
बड्या दुकानदारांवर कारवाई केव्हा ?
विशेष स्कॉड तयार करून अवैध व्यावसायिकांवर कारवाईचा बगडा उगारला जात आहे. मात्र, अवैध दारू विक्री करणारे परवानाधारक दुकानदारांवर कारवाई केव्हा, असा प्रश्न उपस्थित होतो. अवैध दारू विक्री करणारे व्यावसायिक शहरातील प्रतिष्ठित परवानाधारक दारू विक्रेत्यांकडूनच दारूचा माल विकत घेतात. ते अवैधरीत्या दारू विकतात. म्हणूनच किरकोळ दारू विक्री करणारे नागरिक तेथे जातात. अवैध दारू विक्रीला हे किरकोळ व्यावसायिक जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच परवानाधारक दारू विक्रेतेही जबाबदार आहेत. त्यामुळे याप्रकाराकडे पोलीस आयुक्त लक्ष देणार का, असा सवाल जनसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.