सभापती, उपसभापती पदांच्या निवडणुकीला वेग

By Admin | Updated: September 23, 2015 00:30 IST2015-09-23T00:30:58+5:302015-09-23T00:30:58+5:30

अमरावती, भातकुली कृषी उत्पन्न बाजार समितीत स्पष्ट बहुमत कोणत्याही पॅनेलला मिळाले नाही.

Speaker, Vice President post | सभापती, उपसभापती पदांच्या निवडणुकीला वेग

सभापती, उपसभापती पदांच्या निवडणुकीला वेग

इंगोले, अट्टल, वानखडे लक्ष्य : संजय बंड, खोडके लागले कामाला
लोकमत विशेष

अमरावती : अमरावती, भातकुली कृषी उत्पन्न बाजार समितीत स्पष्ट बहुमत कोणत्याही पॅनेलला मिळाले नाही. मात्र सत्ता स्थापनेसाठी नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. गणेश विसर्जनानंतर सभापती, उपसभापतीपदाच्या निवडणुकीला वेग येण्याचे संकेत आहेत.
मागील आठवड्यात बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी निवडणूक पार पडली. यात परिवर्तन पॅनेलने आठ, सहकार पॅनेलने सहा तर शेतकरी एकता पॅनेलने एक जागा काबीज केली. अडते, व्यापारीमधून प्रमोद इंगोले, सतीश अट्टल हे दोन तर हमाल, तोलारी मतदारसंघातून बंडू वानखडे हे एका जागेवर विजयी झालेत. बाजार समितीची सत्ता काबीज करण्यासाठी किमान १० संचालकांची आवश्यकता आहे. मात्र हा जादुई आकडा कोणाकडेही नाही. त्यामुळे हा आक डा पार करण्यासाठी बाजार समितीत लवकरच ‘लक्ष्मी’चे दर्शन होईल, असे चित्र आहे. सतीश अट्टल, प्रमोद इंगोले व बंडू वानखडे या नवनियुक्त संचालकांच्या भूमिकेवरच बाजार समिती सभापती, उपसभापती निवडणुकीचा ‘गेम प्लॅन’ आहे. माजी आ. संजय बंड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वातील परिवर्तन पॅनेलने सर्वाधिक आठ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळविण्याच्या दिशेने कूच केली आहे. आ.यशोमती ठाकूर, काँग्रेसचे प्रदेश महासचिव संजय खोडके, विलास महल्ले यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनेलनेदेखील बाजार समितीवर सहा संचालकांच्या बळावर कब्जा मिळविण्यासाठी गनिमी काव्याची रणनीती आखण्यास प्रारंभ केला आहे. आ.रवी राणा, संयोगिता निंबाळकर यांच्या शेतकरी एकता पॅनेलकडे मिलिंद तायडे हे एकमात्र संचालक आहेत. तायडे यांचे बहुमत सभापती, उपसभापतीपदांच्या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे. गणेश विसर्जन आटोपताच या प्रक्रियेला वेग येणार, असे संकेत आहेत.
माजी आमदार संजय बंड, आ. यशोमती ठाकूर, काँग्रेसचे प्रदेश महासचिव संजय खोडके, आ.रवी राणा आदी नेत्यांच्या नजरा या अडते, व्यापारी मतदारसंघातून विजयी सतीश अट्टल, प्रमोद इंगोले तर हमाल, तोलारी मतदारसंघातून विजयी बंडू वानखडे यांच्या भूमिकेवर लागल्या आहेत.

सोसायटी, ग्राम पंचायतीमधून पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती
सभापती, उपसभापतीपदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी आणि ग्राम पंचायत मतदारसंघातून विजयी झालेल्या संचालकांची निवड केली जाणार आहे. सभापती, उपसभापतीपदावर अडते, व्यापारी अथवा हमाल, तोलारी मतदारसंघातून निवडून आलेल्या संचालकांची नियुक्ती करता येत नाही, असा बाजार समितीचा कायदा आहे. त्यामुळे सेवा सहकारी सोसायटी, ग्राम पंचायत मतदारसंघातून विजयी झालेल्या संचालकापैकी कोणाची सभापती, उपसभापतीपदी वर्णी लागते, हे लवकरच स्पष्ट होईल.

संचालकांची सहकार विभागात नोंद नाही
बाजार समितीत निवडून आलेल्या १८ नवनियुक्त संचालकांची अद्यापपर्यत येथील सहकार नोंदणी विभागात नोंद करण्यात आली नाही. त्यामुळे सभापती, उपसभापतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना प्रशासनाने काढली नसल्याची माहिती पुढे आली आहे. सहकार विभागात नोंदणीनंतरच बाजार समिती सभापती, उपसभापती, विविध समित्यांवर संचालकाच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होईल.

Web Title: Speaker, Vice President post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.