भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा वाढला! खोड माशी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:17 IST2021-09-09T04:17:24+5:302021-09-09T04:17:24+5:30
अमरावती/ संदीप मानकर सोयाबीनला १० हजारांचा भाव काय मिळाला, त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीन पिकाचा पेरा वाढला. मात्र, आता पिकांवर वेगवेगळ्या ...

भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा वाढला! खोड माशी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव
अमरावती/ संदीप मानकर
सोयाबीनला १० हजारांचा भाव काय मिळाला, त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीन पिकाचा पेरा वाढला. मात्र, आता पिकांवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होत असून, भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा वाढला. मात्र, खोड माशी, चक्रीभुंगा व पाने खाणारी अळी यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, तसेच जुलै ते ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडल्याने यंदा सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याचे मत कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
यंदा सोयाबीनला १० हजारांपर्यंत प्रति क्विंटलचा भाव मिळाला. त्यामुळे २०२१-२२ च्या नियोजनानुसार २ लाख ६२ हजार ८८३ हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा करण्यात आला आहे. काही तालुक्यांत काही ठिकाणी खोड माशी, चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव व पाने खाणाऱ्या अळीमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा होण्याची शक्यता आहे.
सोयाबीनचा पेरा (हेक्टरमध्ये) मिळालेला भाव (रुपयात)
वर्ष
२०१६-१७ - २,९१,२४७
२०१७- १८- २,८७,०७३
२०१८- १९- २,९१,६४२
२०१९-२०- २,३८,७२६
२०२०-२१ - २,७९,६५९
२०२१-२२ - २,६२,८८३ १०,०००
बॉक्स :
खोड माशीचा खोड
जिल्ह्यात मिलीबगचा प्रादुर्भाव नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, काही तालुक्यांत सोयाबीनवर खोड माशी, चक्रीभुंगा व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आहे.
बॉक्स :
जुलै, ऑगस्टमध्ये पावसाची दडी
पूर्वी जुुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने खंड पडला. त्यानंतर शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी करून काळजी घेतली. मात्र, आता जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. पावसाच्या खंडामुळे फुले गळणे, बारीक शेंगा गळणे यामुळे त्याचा सोयाबीन पिकावर परिणाम झाला.
कोट
यंदा सोयाबीनचा पेरा चांगला आहे. मात्र, जुलै व ऑगस्ट पावसाचा खंड पडला. त्यामुळे पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होईलच. मात्र, आता काही तालुक्यांत खोडमाशी, चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव आहे. शेतकऱ्यांनी योग्य वेळी फवारणी करून काळजी घेतली आहे.
अनिल खर्चान, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती
कोट
बाजारव्यवस्थेप्रमाणे यंदा सोयबीनला रास्त भाव मिळेल. पेरणी केलेल्या सोयबीनला चांगला भाव मिळू शकतो. यंदा उत्पादन खर्चसुद्धा निघेल अशी स्थिती असल्याने तालुक्यात पेरा वाढला.
अरविंद नळकांडे, शेतकरी, दर्यापूर