सोयाबीनचे भाव तेच, बुधवारी आवक दुप्पट
By Admin | Updated: March 19, 2015 00:22 IST2015-03-19T00:22:16+5:302015-03-19T00:22:16+5:30
सोयाबीनचे भाव कायम असताना आवक मंगळवारच्या तुलनेत बुधवारी दुप्पट झाली आहे.

सोयाबीनचे भाव तेच, बुधवारी आवक दुप्पट
इंदल चव्हाण अमरावती
सोयाबीनचे भाव कायम असताना आवक मंगळवारच्या तुलनेत बुधवारी दुप्पट झाली आहे. त्यामुळे स्थानिक बाजार समितीत खरेदी-विक्रीचे व्यवहार जोरात सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
यावर्षी खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्याने शेतमालाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे भाववाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र ब्राझील, अर्टेंटिना, अमेरिका आदी देशांत सोयाबीचे उत्पादन अधिक प्रमाणात झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भाव कमी राहिले. त्याचा परिणाम भारतातील पिकावरदेखील झाला. परिणामी सोयाबीनचे भाव आतापर्यंत त्याच पातळीवर आहे. काही शेतकऱ्यांनी आर्थिक अडचण भागविण्याकरिता पर्यायी उपाय शोधले. काहींनी बाजार समितीकडे शेतमाल तारण ठेवून कर्ज घेतले. त्यामुळे बाजार समितीत मागील वर्षीच्या तुलनेत आवक अत्यल्प राहिली. मंगळवारी २हजार ३५७ पोते सोयाबीनची आवक झाली. २ हजार ६७५ रुपये प्रतिक्विंटलचे भाव मिळाले असताना बुधवारी मात्र ४ हजार ५१ पोत्यांची आवक झाल्याचे आवक नोंदीवरून स्पष्ट झाले.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुप्पट उत्पादनात घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीला लावलेला खर्चदेखील निघाला नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला. त्यामुळे पुढील हंगामासाठी पैसा कोठून उभारावा या विवंचनेत शेतकरी गुरफटला आहे. खासगी सावकार कर्ज देण्यास धजावत नसल्याने बँकांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे बँकांनी यावर्षी शंतकऱ्यांना पीककर्जाची उपलब्धी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.