घातक अमरवेलीच्या विळख्यात सोयाबीन

By Admin | Updated: August 4, 2015 00:14 IST2015-08-04T00:14:17+5:302015-08-04T00:14:17+5:30

जिल्ह्यातील सोयाबीनसह द्विदल धान्यपिकावर मागील दोन ते तीन वर्षांपासून ‘अमरवेल’ ही परोपकारी वेल मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

Soybean known by the fatal Amevli | घातक अमरवेलीच्या विळख्यात सोयाबीन

घातक अमरवेलीच्या विळख्यात सोयाबीन

शेती पिकावर संकट : रोपांच्या अन्नरसाचे शोषण, उत्पन्नात घट
अमरावती : जिल्ह्यातील सोयाबीनसह द्विदल धान्यपिकावर मागील दोन ते तीन वर्षांपासून ‘अमरवेल’ ही परोपकारी वेल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जवळपास सर्वच तालुक्यांत अमरवेलीचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसून येतो. यामध्ये रोपाच्या अन्नरसाचे शोषण होत असल्याने सरासरी उत्पादनात घट येते. पूर्णपणे नियंत्रणात आणणे कठीण असणाऱ्या या वेलीच्या निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे.
जिल्ह्यात सोयाबीनचे ३ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यापैकी ३ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी ३० जुलैपर्यंत झाली आहे. यासोबतच तूर, मूग व उडीद यासारखी द्विदल पिकेही आहेत. या पिकावर ‘अमरवेल’ या घातक परोपजिवी तणाचा प्रादुर्भाव झाला आहे.
जगभरात या अमरवेलीच्या १७० प्रजाती आढळून येतात. हे तण परोपजिवी असल्याने द्विदल पिकाप्रमाणेच, द्विदल तणावरदेखील त्यांचा जीवनचक्र पूर्ण करतात. बाल्यावस्थेत असताना ही वेल गुंडाळी करून दुसऱ्या वनस्पतीचे खोड तसेच पानावर चिकटते व जमिनीपासून विलग होते. त्यानंतर ती झाडावरील अन्नद्रव्ये सूक्ष्म दातासारख्या असणाऱ्या ‘होस्ट्ररिया’च्या सहाय्याने शोषूण घेतात. यामुळे प्रादुर्भावग्रस्त झाडाची वाढ खुंटते व उत्पादनात घट येते. अमरवेलीमुळे १०० टक्के नुकसान झाल्याचीही उदाहरणे आहेत.
‘अमरवेल’ या परोपजिवी तणाचे नियंत्रण करण्यासाठी जगात अजूनपर्यंत हमखास योजना अस्तित्वात नाही. या वेलीचा बंदोबस्त करणे जिकरीचे काम आहे. एकाच पद्धतीचा अवलंब न करता एकात्मिक तण व्यवस्थापनाद्वारे याचे नियंत्रण करणे अनिवार्य ठरते.

अमरवेलीच्या यशस्वीपणे व्यवस्थापन करताना प्रादुर्भावग्रस्त भागातील शेतकरी बांधवांनी तसेच ज्या गावांमधील ग्रामपंचायतीद्वारे सामूहिकरित्या पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. या अमवेलीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविणे कठीण आहे. मात्र सामूहिक प्रयत्नांनी प्रतिबंध करूशकतो. शेतकऱ्यांनी प्रादेशिक संशोधन केंद्राद्वारा सुचविलेल्या उपाययोजनांसाठी सामाजिक जनजागृती होणे गरजेचे आहे.
- राजेंद्र जाणे, कृषिशास्त्रज्ञ.

अमरवेल या परोपजिवी वेलीमुळे पिकांची वाढ खुंटते. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होतो. याविषयी संशोधन होणे महत्त्वाचे आहे. कृषी विभागाचे कुठलेही धोरण यासंदर्भात नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. या परोपजिवी तणामुळे द्विदल शेतीपिकांचे जे नुकसान होते त्याची नुकसान भरपाई शासनाने द्यावी.
- जहिरुद्दीन इनामदार, शेतकरी.

Web Title: Soybean known by the fatal Amevli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.