घातक अमरवेलीच्या विळख्यात सोयाबीन
By Admin | Updated: September 21, 2014 23:44 IST2014-09-21T23:44:06+5:302014-09-21T23:44:06+5:30
जिल्ह्यातील सोयाबीन, मूग व उडीद सारख्या द्विदल धान्यपिकावर मागील २ ते ३ वर्षांपासून ‘अमरवेल’ ही परोपजीवी वेल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अमरावती व भातकुली तालुक्यात याचा प्रादुर्भाव

घातक अमरवेलीच्या विळख्यात सोयाबीन
गजानन मोहोड -अमरावती
जिल्ह्यातील सोयाबीन, मूग व उडीद सारख्या द्विदल धान्यपिकावर मागील २ ते ३ वर्षांपासून ‘अमरवेल’ ही परोपजीवी वेल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अमरावती व भातकुली तालुक्यात याचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. रोपाच्या अन्नरसाचे शोषण होत असल्याने सरासरी उत्पादनात घट येत आहे. पूर्णपणे नियंत्रणात आणणे कठीण असणाऱ्या या वेलीच्या निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. कृषी विभागाद्वारा हा विषय अद्यापही गंभीरतेने घेतलेला नाही. तसेच याबाबतचे धोरण दिसून येत नाही.
जिल्ह्यात सोयाबीन लागवडीचे २ लाख हेक्टरवर क्षेत्र आहे. सोबत तूर, मूग व उडीद अशा द्विदल धान्य पिके आहेत. या पिकावर ‘अमरवेल’ या घातक परोपजीवी तणाचा प्रादुर्भाव झाला. जगभऱ्यात या अमरवेलीच्या १७० प्रजाती आढळून येतात. हे तण परोपजीवी असल्याने द्विदल धान्याप्रमाने द्विदल तणांवर आपले जीवनचक्र पूर्ण करतात. बाल्यावस्थेत असताना ही वेल गुंडाळी करुन दुसऱ्या वनस्पतीचे खोड तसेच पानावर चिकटते व जमिनीपासून विलग होते. त्यानंतर ती झाडामधील अन्नद्रवे सूक्ष्म दातासारख्या असणाऱ्या ‘होस्ट्ररिया’ च्या साह्याने शोषण करते. अन्नद्रवे शोषून घेतल्याने प्रादुर्भावग्रस्त झाडाची वाढ खुंटते. त्यामुळे पिकाच्या उत्पादनात घट येते, अमरवेल पिकामुळे १०० टक्के नुकसान झाल्याची उदाहरणे आहेत
‘अमरवेल’ या परोपजीवी तणाचे नियंत्रण करण्यासाठी जगात अजूनपर्यंत हमखास योजना अस्तित्वात नाहीत. या वेलीचा बंदोबस्त करणे जिकरीचे काम आहे. एकाच पध्दतीचा अवलंब न करता एकात्मिक तण व्यवस्थापनाद्वारे यांचे नियंत्रण करणे अनिवार्य ठरते.