अधिकाऱ्यांचा शेतात सोयाबीन पाहणी दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 22:59 IST2018-07-13T22:59:21+5:302018-07-13T22:59:35+5:30

अधिकाऱ्यांचा शेतात सोयाबीन पाहणी दौरा
लोकमत न्यूज नेटवर्क
कुऱ्हा : सोयाबीन बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी धडकल्यानंतर तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांनी १२ जुलैला थेट शेतात पाहणी केली. ‘लोकमत’ने हा मुद्दा उजेडात आणल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान मानले.
महाबीज, खंडेलवाल, मयूर सीड्स, रवि बीज या कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्याबाबत तक्रारी तालुका कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी केल्या आहेत. यापैकी काही बियाणे उगावलेच नाही, तर काहींच्या शेतात बियाण्यांची उगवण २० टक्केच आहे. हा विषय ‘लोकमत’ने १२ जुलैला प्रकाशित करताच तालुका कृषी अधिकारी अरुण गजभिये, उपविभागीय अधिकारी सातपुते यांच्यासह पंचायत समितीचे कृषी अधिकारी गिरी यांनी पीकपाहणी दौरा केला.
घोटा येथील आनंदराव दवाळे यांच्या तीन एकर शेतात रवि बीज कंपनीचे सोयाबीन २० टक्केच उगवले. त्यांच्यासह कृषी विभागाला तक्रार प्राप्त सहा शेतकऱ्यांच्या पंचनामे करण्यात आले. त्याचा अहवाल सात दिवसांत तयार होऊन शेतकऱ्याला मिळणार असून, यानंतर शेतकऱ्यांनी ग्राहक मंचात जाऊन संबंधित कंपनीविरोधात नुकसानभरपाईसाठी तक्रार दाखल करावी, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी शास्त्रज्ञ चंदनकर, कृषी सहायक जवंजाळ, संदीप दवाळे व इतर शेतकरी यावेळी उपस्थित होते.
शेतात २० ते २५ टक्केच सोयाबीन उगवले, असे आमच्या लक्षात आले. लवकरात लवकर त्याचा अहवाल शेतकºयांना मिळेल. यानंतर संबंधित बियाणे कंपनीविरोधात नुकसानभरपाईसाठी ग्राहक मंचात जावे लागेल. बियाणे कंपनीवर कृषी विभागाला कारवाई करता येत नाही.
- अरुण गजभिये, तालुका कृषी अधिकारी, तिवसा