अचलपूर बाजार समितीत सोयाबीन बेभाव

By Admin | Updated: October 24, 2016 00:14 IST2016-10-24T00:14:58+5:302016-10-24T00:14:58+5:30

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला अस्मानी व सुल्तानी संकटाचा भार सोसवत नसल्यामुळे त्याला आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागत आहे.

Soyabean impairment in Achalpur market committee | अचलपूर बाजार समितीत सोयाबीन बेभाव

अचलपूर बाजार समितीत सोयाबीन बेभाव

क्विंटलमागे ३०० ग्रॅमची कट्टी : व्यापारी-अडत्यांची मनमानी, शेतकऱ्यांची कोंडी
परतवाडा : जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला अस्मानी व सुल्तानी संकटाचा भार सोसवत नसल्यामुळे त्याला आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. मात्र अचलपूर बाजार समितीत अडत्या-व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराने सोयाबीन पडत्या भावाने खरेदी केले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केल्या जात आहे.
दिवाळी सण पाहता मोठ्या प्रमाणात अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज हजारो क्विंटल सोयाबीन येत आहे. अशातच स्थानीय व्यापारी-अडत्यांनी थोड्या ओलसर असलेल्या सोयाबीनच्या प्रति क्वंटलमागे तीनशे ग्रॅम कट्टी कापायला सुरुवात केल्याने कमी दर आणि त्यातही वजनाची कट्टी होत असल्याने शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असल्याचे चित्र आहे. ही कट्टी बाजार समितीच्या कुठल्याच नियमात बसत नसताना दिवसाढवळ्या शेतकऱ्यांची सुरू असलेली लुबाडणूक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान पोहोचवणारी ठरली आहे.
दुसरीकडे बाजार समितीच्या कुठल्याच संचालकाने याविरुद्ध आवाज न उठविणे यावरही शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
बेभाव सोयाबीन
जिल्ह्यातील मोठ्या बाजार समितीत गणना होणाऱ्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांचा शेतमाल मातीमोल भावाने खरेदी केल्या जात आहे. शेतमालाचे दर ठरविण्याची पद्धत शासकीयदृष्ट्या नियमबाह्य असून सोळाशे ते दोन हजार ७०० रूपये दरापर्यंत दाताने दाबून प्रतवारी ठरवून सोयाबीन खरेदी केले जात असल्याचे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी)

कट्टीत गेले १३ किलो सोयाबीन
खरेदीदार व्यापाऱ्यांच्या मनमौजी कारभाराचा फटका सवर शेतकऱ्यांना बसत आहे. सोयाबीन ओलसर असल्याची बतावणी करीत प्रतिक्विंटल मागे तीनशे ग्रॅमची कट्टी कापल्याच्या कारणावरून व्यापारी, अडते आणि शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद उफाळून येत आहेत. कुष्ठा येथील शेतकरी अविनाश चौधरी यांनी शुक्रवारी बाजार समितीमध्ये ४५ क्विंटल सोयाबीन आणले होते. अशोककुमार जैन यांच्या अडतीवर हे सोयाबीन विकण्यात आले. त्या सोयाबीनमध्ये प्रतिक्विंटल ३०० ग्रॅम कट्टी कापल्याने चौधरी यांचे १३ किलो सोयाबीन अतिरिक्त गेले. याच पद्धतीने गोरगरीब शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असल्याचे चित्र आहे.

दाताने दाबून ठरते प्रतवारी
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदीची अद्यावत अशी यंत्रणा नाही. परिणामी कुठल्याच परीभाषेत व नियमबाह्य असलेली पद्धत सर्रासपणे सुरू आहे. सोयाबीनचा दाणा दाताखाली दाबून नंतर खरेदीदार प्रतवारी ठरवत असल्याचे चित्र आहे. यातच दिलेल्या दराप्रमाणे शेतकऱ्याला मिळेल त्या भावाने सोयाबीन द्यावे लागत आहे.

Web Title: Soyabean impairment in Achalpur market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.