जिल्ह्यात एक लाख ३५ हजार हेक्टरवर खरीप पेरणी
By Admin | Updated: June 25, 2015 00:17 IST2015-06-25T00:17:58+5:302015-06-25T00:17:58+5:30
जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीला वेग आला आहे. मंगळवार २४ जूनपर्यंत ७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन होते.

जिल्ह्यात एक लाख ३५ हजार हेक्टरवर खरीप पेरणी
जितेंद्र दखने अमरावती
जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीला वेग आला आहे. मंगळवार २४ जूनपर्यंत ७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन होते. त्यापैकी सुमारे एक लाख ३५ हजार ०४ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणीर् केली आहे. ही पेरणी १९ टक्के इतकी आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सोयाबीनची ४६ हजार ५५ हेक्टरमध्ये तर तुरीची पेरणी १६ हजार ६६७ हेक्टरमध्ये झाली आहे. जिल्हतील चौदाही तालुक्यात पेरण्यांना वेग आल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
यंदा जिल्ह्यात ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्रावर पीक लागवडचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यानुसार मंगळवारपर्यंत जिल्ह्यात खरीप पेरणीच्या कामाला बऱ्यापैकी वेग आला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन आठवडयांमध्ये सर्वाधिक लागवड सोयाबीनची झाली असून त्यानंतर तुरीचा क्रमांक लागतो. आतापर्यत सुमारे ६ हजार २०१ हेक्टरमध्ये कपाशीची, २ हजार ८६० हेक्टरमध्ये ज्वारीची, २ हजार ४६२ हेक्टरमध्ये मुगाची, २ हजार ३४३ हेक्टरमध्ये धानाची, एक हजार ९५ हेक्टरमध्ये मक्याची तर उडिदाची ६३२ हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्ह्यात सध्या खरिपाच्या पेरण्या करण्यात आला आहेत.
यंदा समाधानकारक पाऊस झाल्यास सोयाबीनचे चांगले उत्पादन होण्याची शक्यता आहे. काही वर्षांत अनियमित पावसामुळे सोयाबीनसह इतर पिकांचे उत्पादन घटले. कृषी विभागाने खत, बियाण्यांचे नियोजन केले आहे. दोन दिवसांपासून पावसाने उघाड दिल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी सवड मिळाली असून पेरणीच्या कामात ठिकठिकाणी शेतकरी व्यस्त असल्याचे दिसते. पावसाला पुन्हा सुरूवात होण्यापूर्वी शक्यतोवर पेरण्या आटोपण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसते.