आठवड्यात सहा टक्केच पेरणी

By Admin | Updated: July 16, 2015 00:34 IST2015-07-16T00:34:24+5:302015-07-16T00:34:24+5:30

जिल्ह्यात खरीपाचे ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यापैकी ५ लाख ८९ हजार २१० हेक्टर क्षेत्रावर १५ जुलैअखेर पेरणी आटोपली.

Sowing of 6% per week | आठवड्यात सहा टक्केच पेरणी

आठवड्यात सहा टक्केच पेरणी

२२ दिवसांपासून पावसात खंड : जिल्ह्यात कोरडा दुष्काळसदृश स्थिती
अमरावती : जिल्ह्यात खरीपाचे ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यापैकी ५ लाख ८९ हजार २१० हेक्टर क्षेत्रावर १५ जुलैअखेर पेरणी आटोपली. ८२.४१ टक्केवारी आहे. मागील आठवड्यात ८ जुलै रोजी अखेर ७६.४३ टक्के पेरणी झाली होती. म्हणजेच एका आठवड्यात ५.६८ क्षेत्रात पेरणी झाली आहे. २२ दिवसांपासून पावसात खंड असल्यामुळे खरीपाच्या पेरण्या थबकल्या आहे. तसेच पावसाच्या अभावामुळे सिंचनाची सुविधा वगळता उर्वरित कोरडवाहू क्षेत्रात पिकांना मोड येण्याची शक्यता आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस व तीन आठवड्यांपासून पाऊस निरंक यामुळे जिल्ह्यात कोरड्या दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात १२ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. त्यानंतर पाच दिवसांचा खंड राहून पुन्हा १८ ते २३ जूनपर्यंत पाऊस पडला. हा पाऊस पेरणीयोग्य असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली. परंतु २४ जुलैनंतर आजपर्यंत अशा २२ दिवसात पाऊस बेपत्ता आहे. जमिनीत आर्द्रता नाही व दिवसाचे वाढणारे तापमान यामुळे पहिल्या टप्प्यातील पेरणी झालेल्या पिकांची रोपे माना टाकत आहे. तर नंतरची पेरणी झालेल्या शेतामधील बिजांकूर जमिनीत ओलावा नसल्याने सडू लागले आहे.
ज्या शेतकऱ्यांजवळ सिंचनाची सुविधा आहे त्यांनी तुषार सिंचनाद्वारे पिके जगविणे सुरू कले आहे. परंतु जिरायती क्षेत्रामधील पिकांची अवस्था बिकट आहे. सद्यस्थितीत किमान साडेचार लाख हेक्टर जिरायती क्षेत्रातील पिके धोक्यात आली आहे. सलग तीन वर्षांपासून नापिकीचे सत्र असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ८७ हजार ४५७ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झालेली नाही. ही नियोजित क्षेत्रापेक्षा १३० टक्के अधिक क्षेत्र आहे. कपाशीची १ लाख ६३ हजार ५२८ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. तुरीचे ८७ हजार ८०१ हेक्टर क्षेत्र आहे.
अन्य पिकांमध्ये भात ७ हजार ५४० हेक्टर, ज्वारी १० हजार ६२१ हेक्टर, बाजरी १० हेक्टर, मका ४ हजार ४४४ हेक्टर, इतर तृणधान्य ४५ हेक्टर, मूग १८ हजार ३२५ हेक्टर, उडिद ५ हजार १५० हेक्टर, इतर कडधान्य ४१० हेक्टर, भूईमुग ८८८ हेक्टर, निळ ३० हेक्टर, सूर्यफुल ४ हेक्टर व इतर भाजीपाला २ हजार ६९७ हेक्टर व ऊसाचे २६० हेक्टर क्षेत्र आहे.

पिकांची वाढ खुंटली, अंकुर करपले
जिल्ह्यात २४ जूनपासून आजतारखेपर्यंत पाऊस निरंक आहे. यामुळे जमिनीत आर्द्रता नाही. दिवसाचे ऊन यामुळे ताण बसून पिकांची रोपे माना टाकत आहे व पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी किटकनाशकाची फवारणी केली नाही. त्यामुळे रसशोषक किडीचा प्रादूर्भाव झाला आहे. ओलाव्या अभावी जमिनीतील बियांचे अंकुर सडत आहे.

पिकांवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
पहिल्या टप्प्यातील सोयाबीन, कपाशी, तूर पिकांवर पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी किटकनाशकांची फवारणी केली नाही. त्यामुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. यासाठी हलकी कोळपणी तसेच पिकांना मातीचा भर देणे महत्त्वाचे आहे. यासाठी किटकनाशकासह निंबोळी अर्क व २ टक्के युरियाची फवारणी करावी. पाऊस नाही तसेच जमिनीत ओलावा नसल्याने तणनाशकाची फवारणी करु नये, असे किटकशास्त्रज्ञ राजेंद्र जाणे यांनी सांगितले.

मेळघाटातील आदिवासींचे मुठवा बाबाला साकडे
धारणी : मेळघाटातील ८० टक्के जनतेची रोजी रोटी ही शेती व्यवसायावर टिकून आहे. पीक चांगले तर मेळघाट सुखी व शेतीने दगा दिला तर सर्वत्र दु:ख व चिंतेचे वातावरण हे समिकरण ठरले आहे. गेल्या ४-५ वर्षापासून तर सतत नापीकीमुळे बळीराजा हैराण झाला आहे.
यावर्षी तर पावसाने कहरच केला आहे. पेरणी झाल्यानंतर दडी मारुन गेलेला पाऊस महिना उलटत आहे तरी येण्याचे नाव घेत नसल्याने पीके करपू लागली. तर अनेकांना मशागतीनंतर पेरणीसुध्दा करता आली नाही. त्यामुळे पावसाविना सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पाऊस येण्यासाठी विविध प्रकारचे युक्त्या व क्लृप्त्या आणि शक्कल लढविली जात आहे. सर्व प्रकारचे प्रयत्न करुनही बळीराजाच्या शेतात पावसाचा थेंबही पडेनासा झाल्याने त्याच्या डोळ्यातूनच पाणी पडायला सुरुवात झाली आहे.
गावोगावी धार्मिक स्थळे, मंदीरात देवाला पाण्याने आंघोळ घातली जात आहे. देवाला आंघोळ घातलेले पाणी गावाजवळील नदी नाल्यात सोडल्यास पाऊस येतो, अशी भाबडी आशा ठेवून हा प्रकार वापरला जात आहे. तर लहान मुले धोेंडी धोंडी पाणी दे म्हणत गावभर फेऱ्या काढत आहे. मोठी माणसे व महिला वर्ग ‘डेडर माता पाणी दे’ म्हणत डोक्यात लिंबाचा पाला टोपली बेडूक (डेडर माता) घेऊन देवाकडे साकडे घालत आहे. सध्या हे चित्र जवळपास सर्वच गाव खेड्यात दररोज पहावयास मिळत आहे.
धारणी येथील महिला भगिनींनी तर राधाकृष्ण मंदिरात ५६ भोग (५६ प्रकारचे व्यंजन) तयार करुन देवाला अर्पण केले. इतके सर्व करुनही वरुण राजा रुसलेलाच आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचा वालीच रुसला असल्याने पुढे काय होईल, या चिंतेत एक-एक दिवस काढीत आहे.

Web Title: Sowing of 6% per week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.