भाईगिरीचा नाद, सुडाच्या भावनेतून तरुणाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST2019-09-16T06:00:00+5:302019-09-16T06:00:54+5:30
भाईगिरी करीत असल्याच्या कारणावरून दोघांत वाद झाला. रोहनने ऋतिकला एक थापड लगावली. नेमकी हीच बाब ऋतिकला खटकली. त्याने वचपा काढण्यासाठी रात्री १० वाजताच्या सुमारास मित्रांना घेऊन यशोदानगर गाठले. तेथील एका पानटपरीवर उभा असलेल्या भूषणसोबत ऋतिकने वाद करून त्याच्या मांडीवर चाकूने जबर वार केला.

भाईगिरीचा नाद, सुडाच्या भावनेतून तरुणाची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भाईगिरी करण्याचा नाद असणाऱ्या काही जणांनी सूड भावनेतून एका तरुणाची चाकुने भोसकून हत्या केली. ही थरारक घटना शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास यशोदानगर चौकात घडली. भूषण अनिल बांबुर्डे (२०,रा.उत्तमनगर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी ऋतिक सिद्धार्थ भालेकर (२२), विशाल धनराज गडलिंग (२२), मंगेश बापुलाल तायडे (२०, तीनही रा. पंचशीलनगर) यांना अटक केली, तर एका १७ वर्षीय अल्पवयीनास ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रानुसार, मृत भूषण व त्याचा मोठा भाऊ रोहन यांनी चार महिन्यांपूर्वी एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला होता. त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०७ गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्यामुळे भूषण व रोहन यांचा परिसरात दबदबा निर्माण झाला होता. शनिवारी दुपारच्या सुमारास रोहन व ऋतिक आमनेसामने आले. त्यावेळी भाईगिरी करीत असल्याच्या कारणावरून दोघांत वाद झाला. रोहनने ऋतिकला एक थापड लगावली. नेमकी हीच बाब ऋतिकला खटकली. त्याने वचपा काढण्यासाठी रात्री १० वाजताच्या सुमारास मित्रांना घेऊन यशोदानगर गाठले. तेथील एका पानटपरीवर उभा असलेल्या भूषणसोबत ऋतिकने वाद करून त्याच्या मांडीवर चाकूने जबर वार केला. चाकूहल्ला होताच यशोदानगर चौकात प्रचंड खळबळ उडाली. भूषणच्या मांडीतील नस कटल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. या घटनेच्या माहितीवरून पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांचे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. तत्पूर्वीच काही नागरिकांनी भूषणला रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालय नेले. पोलिसांनी घटनास्थळाहून रक्तनमुने घेऊन चौकशी सुरू केली होती. भूषणला दाखल करतेवेळी परिसरात रक्ताचा सडाच पडला होता. दरम्यान डॉक्टरांनी भूषणची तपासणी सुरू केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. एकीकडे गणेशोत्सवाची धूम तर दुसरीकडे हत्येची घटना घडल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणात आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस पथकाने तीन आरोपींना अटक करून एका अल्पवयीनास ताब्यात घेतले आहे. सोमवारी तिघांना न्यायालयात हजर केले जातील. अल्पवयीनास बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाणार आहे.
गुन्हे शाखेने दोघांना शिताफीने पकडले
हत्येच्या घटनेंनंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांनी इर्विन रुग्णालय गाठले. त्याच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राम गिते यांच्या पथकानेही आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान महादेवखोरीमागील जंगलातून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ऋतिक सिद्धार्थ भालेकर व विशाल धनराज गडलिंग यांना शिताफीने अटक केली.
घटनास्थळाच्या थोड्याच अंतरावर पोलीस बंदोबस्त
यशोदानगर चौक नेहमीच गजबजलेला असतो. त्यातच गणेश विसर्जनाची धूम शनिवारी होती. त्यामुळे यशोदानगर चौकात पोलीस बंदोबस्त होता. याच चौकातील एका बाजूस असलेल्या पानटपरीवर भूषणवर चाकूहल्ला चढविण्यात आला. चौकात पोलीस हजर असताना गुंड प्रवृत्तीचे तरुण इतके गंभीर अपराध करतात, यावरून गुन्हेगारीवर पोलिसांचा कुठलाही वचक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.