शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या व्यथा
By Admin | Updated: May 1, 2015 00:34 IST2015-05-01T00:34:56+5:302015-05-01T00:34:56+5:30
संवाद पदयात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी हिरपूर येथे उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या

शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या व्यथा
अमरावती : संवाद पदयात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी हिरपूर येथे उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या व त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न संसदेत मांडण्याची ग्वाही त्यांनी दिली.
पदयात्रेदरम्यान हिरपूर येथे २० मिनिटांपर्यंत राहुल गांधी यांनी सततची नापिकी, अवकाळीमुळे झालेले नुकसान, शासनाकडून मिळालेली तोकडी मदत, सातबारा कोरा करणे, शेतकऱ्यांचा शेतमाल संपल्यावर वाढणारे शेतमालाचे दर, शेतमालासाठी आधारभूत भावाची हमी अशा अनेक समस्या शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्यात. राहुल गांधींच्या या दौऱ्यामुळे प्रशासनाला जाग येईल काय? कापूस व सोयाबीनची आजची स्थिती, जलंसधारणाची मंदगतीने सुरू असलेली कामे, पीक विम्यात होत असलेली शेतकऱ्यांची फसवणूक आदी विषयांवर बाजार समितीचे सभापती श्रीकांत गावंडे, बंडू जगताप (जळगाव), सचिदानंद काळे (वाठोडा), पांडुरंग चवरे (निंभोरा), राजू तुपसुंदरे (रामगाव), नरुभाई शेख (रघुनाथ पेठ), शेख इब्राहिम उर्फ बब्बू भाई (दत्तापूर) या शेतकऱ्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत संवाद साधला. हे सर्व प्रश्न संसदेत मांडून शेतकऱ्यांना न्याय देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली. (प्रतिनिधी)