नांदगाव पेठ : शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’ असा गाजावाजा करणारी इंडिया बुल्स कंपनी आता शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. रेल्वे लाईनसाठी सुरू झालेल्या कामाकरिता होणाऱ्या सोफियाच्या वाहतुकीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जात आहे. मात्र, कंपनीने याबाबत काहीच दखल न घेतल्याने पीडित शेतकऱ्यांनी गुरुवारी नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.सोफिया ऊर्जा प्रकल्पासाठी रेल्वे लाईनचे काम सध्या युध्दस्तरावर सुरू आहे. वलगाव, टाकळी, नांदुरा, खानापूर, कठोरा येथील शेतकऱ्यांच्या शेतामधून रेल्वेमार्ग गेला आहे. या रेल्वे मार्गाची जमीन सोफिया कंपनीने अधिग्रहीत केली. मात्र आजूबाजूची शेती सोफियाच्या भरधाव मालवाहू वाहनांच्या धुळीमुळे नष्ट होत आहे. धूळ बसलेल्या पिकांची वाढ होत नाही. पर्यायाने ती कोमेजून जात आहे. नैसर्गिक आपत्तीत आधीच शेतकरी हवालदील झाला आहे. त्यात सोफियाची ही मनमानी त्यांच्या तोंडाजवळ आलेला घास हिरावून घेत आहे.टाकळी व नांदुरा परिसरातील मौजे खानापूर शेतसर्वे ५७/४, ५७/१, ५८/२, ५२/२, ६१/२, १०१/२, ११६/२, असे शेतशिवारातील पीडित शेतकऱ्यांची शेती आहे. शेतीजवळूनच विनापरवानगी सोफियाने कच्चा रस्ता काढला. शेतीतून रस्ता असल्याने कोणतीही वाहतूक झाली तरी केवळ धूळच उडते व ती शेतमालावर येऊन बसते. जीवाचे रान करुन शेतीत सोने पिकवले आणि या सोन्यावर सोफियाने घाण करुन टाकली आहे. पर्यायाने तोंडाजवळ आलेले पीक उद्ध्दस्त होत असल्याचे पाहूनही दखल न घेतल्यामुळे अन्यायग्रस्त शेतकरी रामराव सोनवणे, किशोर आवारे, मारोतराव तायडे, संजय काटे, अविनाश वाळेकर, अनिल सावरकर, रामकृष्ण श्रावण हाडोळे, संजय राऊत, गजानन बोबडे, रघुनाथ सावरकर आदींनी नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठून सोफिया कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रार केली आहे. (वार्ताहर)
सोफियाची वाहतूक शेतकऱ्यांचा कर्दनकाळ
By admin | Updated: December 13, 2014 00:39 IST