सोफियाची पाईपलाईन फुटल्याने शेतात शिरले पाणी
By Admin | Updated: September 12, 2015 00:12 IST2015-09-12T00:12:37+5:302015-09-12T00:12:37+5:30
तालुक्यातील पार्डी शिवारात सोफिया वीज प्रकल्पासाठी नेण्यात आलेली पाईपलाइन फुटल्यामुळे येथील सात शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे.

सोफियाची पाईपलाईन फुटल्याने शेतात शिरले पाणी
मोर्शी : तालुक्यातील पार्डी शिवारात सोफिया वीज प्रकल्पासाठी नेण्यात आलेली पाईपलाइन फुटल्यामुळे येथील सात शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. याविषयी सुचविले असता कंपनी शेतकऱ्यांना थारा देत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक देऊन नुकसान भरपाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना आ. डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
पार्डी येथील शेतकरी प्रल्हाद निंभोरकर, नरेश इंगोले, पुंडलिकराव इंगोले, श्रीकृष्ण दाढे, राजेश्वर दाढे, मारोतराव दाढे, बापुराव कळमकर यांच्या शेताजवळून सोफिया वीज प्रकल्पाची पाईपलाइन गेली आहे. ही पाईपलाइन मागील एक वर्षापासून लिकेज आहे. या पाईपलाईनचे पाणी सदर शेतकऱ्यांच्या शेतात शिरत होते. परंतु लिकेजमध्ये वाढ झाल्याने यावर्षी तब्बल सात शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही शेतातून ही पाईपलाइन तीन मीटर आतून गेली आहे. शेतात सर्वत्र पाणी साचल्यामुळे पीक पूर्णत: सडले असून जमिनीचा पोत खराब झाला आहे.
याबाबत कंपनीला २५ आॅगस्ट रोजी पुराव्यासह लेखी निवेदन देऊन तक्रार केली होती. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली व मदतीचे आश्वासन दिले. परंतु अद्याप मदत मिळाली नाही. मागील वर्षीची नुकसान भरपाई नाही व पाईपलाइनची दुरूस्ती नसून नुकसान वाढले आहे. शेतीवर उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी संजय घुलक्षे, विनोद खरपकर, नरेश इंगोले, पुंडलिक इंगोले, शेख लतिफ, लक्ष्मण दाढे, मारोतराव दाढे, अब्दुल जावेद, बापूराव कळमकर, स्वप्निल निंभोरकर, मोरेश्वर दाढे, गजानन दाढे, पंजाबराव बोरकर आदी शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)