क्वारंटाईन उच्चारताच त्याने ठोकली धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:01 IST2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:01:25+5:30

मला येथे ठेवल्यास मी गळफास घेऊन आत्महत्या करेन, अशी धमकी त्याने उपस्थितांना दिली. त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या आईलाही आणण्यात आले. परंतु, मुलाने थेट जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. त्याला पकडण्याकरिता उपस्थितांनी धाव घेतली. परंतु काही क्षणात तो दिसेनासा झाला. नजीकच्या ढाकणा येथे सासुरवाडीत जात असल्याचे ओरडत गेला. हा सर्व प्रकार सोमवारी दुपारी १२ वाजता घडला. त्यानंतर मंगळवारी पहाटे त्याच्या आईनेही कुणाला न सांगता पोबारा केला.

As soon as he uttered the quarantine, he hit Dhoom | क्वारंटाईन उच्चारताच त्याने ठोकली धूम

क्वारंटाईन उच्चारताच त्याने ठोकली धूम

ठळक मुद्देसेमाडोह येथील प्रकार : आईदेखील रफूचक्कर, जिल्हा परिषद सदस्यांसह पदाधिकारी, डॉक्टरांकरवी केलेली मनधरणी व्यर्थ

नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : कोरोनाची लागण असलेल्या यवतमाळ रेड झोन परिसरातून आल्याने डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. ताप असल्याने त्याची जिल्हा परिषद शाळेतील क्वारंटाईन कक्षात राहण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र, क्वारंटाईन शब्द उच्चारताच त्याने गर्भीत धमकी देत तेथून धूम ठोकली. हा सर्व प्रकार सोमवारी दुपारी सेमाडोह येथे घडला. पाठोपाठ मंगळवारी त्याची आईसुद्धा तेथून परागंदा झाली.
मला येथे ठेवल्यास मी गळफास घेऊन आत्महत्या करेन, अशी धमकी त्याने उपस्थितांना दिली. त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या आईलाही आणण्यात आले. परंतु, मुलाने थेट जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. त्याला पकडण्याकरिता उपस्थितांनी धाव घेतली. परंतु काही क्षणात तो दिसेनासा झाला. नजीकच्या ढाकणा येथे सासुरवाडीत जात असल्याचे ओरडत गेला. हा सर्व प्रकार सोमवारी दुपारी १२ वाजता घडला. त्यानंतर मंगळवारी पहाटे त्याच्या आईनेही कुणाला न सांगता पोबारा केला. यंत्रणेने माय-लेकाची शोधमोहीम चालविली. मुलताई ढाणा, सेमाडोह येथील मूळ रहिवासी असलेला एक युवक यवतमाळ जिल्ह्यातून सोमवारी दुपारी सेमाडोह येथे दाखल झाला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी महेश कुर्तकोटी यांनी त्याची तपासणी केली. ताप असल्याचे निदान झाले. उपचारानंतर त्याला जि.प. शाळेत क्वारंटाईनबाबत सुचविले. या वेळी जि.प. सदस्य सुनंदा काकड, सरपंच प्रल्हाद मावस्कर, तलाठी भुसूम, शिवा काकड, संदीप बारवे आणि डॉक्टरांनी त्याची समजूत काढली. परंतु कुणाचे काहीच न ऐकता त्याने जंगलात धूम ठोकली.

मुलासह - मातेचा शोध सुरू
क्वारंटाईन न होता तेथून जंगलात पळून गेलेल्या त्या तरूणाचा यंत्रणेने ढाकणा येथे त्याच्या सासुरवाडी व परिसरातील गावात शोध चालविला आहे. दुसरीकडे त्याच्या आईचाही आजूबाजूच्या गावात शोध घेणे सुरू आहे.

ताप असल्याने त्यांना क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले होते. परंतु गळफास घेण्याची धमकी देत सोमवारी त्याने पळ काढला. मंगळवारी पहाटे त्याची आई पोबारा झाली. दोघांचाही शोध घेतला जात आहे.
- महेश कुर्तकोटी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, सेमाडोह

Web Title: As soon as he uttered the quarantine, he hit Dhoom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.