भेटीगाठी, विजयी रॅली काहींची मुंबईवारी !
By Admin | Updated: October 20, 2014 23:03 IST2014-10-20T23:03:38+5:302014-10-20T23:03:38+5:30
१३ व्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या जिल्ह्यातील आठपैकी चार आमदारांनी विजयानंतरचा पहिला दिवस मतदारांच्या भेटीगाठीत घालविला. भाजपचे चार आमदार बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत.

भेटीगाठी, विजयी रॅली काहींची मुंबईवारी !
अमरावती : १३ व्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या जिल्ह्यातील आठपैकी चार आमदारांनी विजयानंतरचा पहिला दिवस मतदारांच्या भेटीगाठीत घालविला. भाजपचे चार आमदार बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत.
रविवारी निकाल जाहीर होताच नवनिर्वाचित आमदारांनी मतदारांचे भरुभरुन आभार मानले. मतमोजणी स्थळापासून विजयी रॅली काढली. मात्र, सोमवार उजाडताच पुन्हा विजयी आमदारांनी मतदारांचे अभिवादन स्वीकारले. तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी सकाळपासूनच मतदारसंघात भेटीगाठी घेतल्या. मतदारांचे आभार मानत असताना भविष्यात जोमाने विकासकामे केली जातील, असे आश्वासन दिले.
ग्रामीण भागातही यशोमतींनी भेट देऊन मतदारांचे आशीर्वाद घेतले. गावखेड्यात यशोमतींच्या स्वागतासाठी युवकांची लक्षणीय गर्दी होती. विजयी रॅलीत महिलांनी प्रचंड जल्लोष केला.
बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी सोमवारी सकाळपासूनच घरी येणाऱ्यांचे अभिवादन स्वीकारले. दुपारी शहरी भागात काही ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या आणि मतदारांचे आभार मानले. नव्याने मतदारसंघातील विकासकामे पूर्णत्वास लावण्याचे अभिवचनही त्यांनी जनतेला दिले. स्लम वस्त्यांमध्ये जाऊन त्यांनी तेथील मतदारांचे आभार मानले. धामणगावरेल्वेचे आमदार वीरेंद्र गजताप यांनी नांदगाव खंडेश्वर येथे विजयी रॅली काढली. रॅलीनंतर सभा घेऊन मतदारांचे आभार मानले. दुपारी चांदूररेल्वे येथे घरीच जेवण घेतले. त्यानंतर मंगरुळ दस्तगिर येथील वीजेच्या धक्काने मरण पावलेल्या युवकाच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले त्यानंतर देवदर्शन घेतले. व सायंकाळी मुंबईला रवाना झाले. अचलपुरचे आ. बच्चू कडू सकाळपासून मतदारांच्या भेटीगाठी घेण्यात मग्न होते. घरी येणाऱ्यांचे अभिवादन त्यांनी स्वीकारले. तसेच विकासकामांचा आढावाही घेतला. सायंकाळी मुंबईला रवाना होताना त्यांनी कार्यकर्त्यांना काही गावांना ेभेटी देण्याच्या सूचना दिल्या.
आमदार सुनील देशमुख, अनिल बोंडे, रमेश बुंदेले, भिलावेकर पक्षाने बोलावलेल्या बैठकीसाठी मुंबईला गेले आहेत.