वडाळी जंगलात सौर ऊर्जेवरील हातपंप
By Admin | Updated: March 16, 2016 08:29 IST2016-03-16T08:29:25+5:302016-03-16T08:29:25+5:30
वडाळी जंगलात वन्यपशुंची तृष्णा भागविण्यासाठी सोलर ऊर्जेवर चालणारे हातपंप बसविले जाणार आहेत.

वडाळी जंगलात सौर ऊर्जेवरील हातपंप
पहिलाच प्रयोग : वन्यजीवांची तृष्णा भागविण्यासाठी पाच लाखांचा खर्च
अमरावती : वडाळी जंगलात वन्यपशुंची तृष्णा भागविण्यासाठी सोलर ऊर्जेवर चालणारे हातपंप बसविले जाणार आहेत. त्याकरिता पाच लाख रूपयांचा खर्च होणार असून वडाळी जंगलात पहिल्यांदाच हा प्रयोग राबविला जात आहे. परिणामी उन्हाळ्यात वन्यपशुंसमोर उद्भवणारा पाणीप्रश्न निकाली निघण्याची आशा पल्लवीत झाली आहे.
सोलर ऊर्जेवर चालणारे हातपंप मेळघाट व्याघ्र प्रकल्पात कार्यान्वित असून या सौरपंपांमुळे वन्यपशुंंच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. वडाळी-पोहरा जंगलात बिबट, हरिण, रानडुक्कर, वाघ, चितळ, माकड आदी वन्यपशुंसह पक्ष्यांची संख्या अधिक आहे. मात्र, जंगलात जलस्त्रोत कमी प्रमाणात असल्यामुळे वन्यपशुंना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आता जेमतेम उन्हाळा सुरू झाला असून जंगलातील पाणवठ्यांमधील पाणी झपाट्याने आटू लागले आहे. त्यामुळे वडाळी जंगलातील भवानी तलाव परिसरात एक हातपंप आणि सोलरपंप बसविला जात आहे. या भागात वन्यपशुंची वर्दळ मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे हे ठिकाण सोलरपंप बसविण्याकरिता निवडले गेले आहे.
सोलरपंप स्वयंचलित असून सूर्यप्रकाश असेपर्यंतच हातपंपाद्वारे पाणी उपणे शक्य होणार आहे.
वन्यपशुंसाठी नव्याने पाणवठे तयार करण्यात आली आहेत. सोलर पंपाद्वारे हातपंपातून पाणी पाणवठ्यात सोडण्याचीे व्यवस्था करण्यात आली आहे. सोलर ऊर्जेवरील हातपंपांसाठी वन्यजीव संरक्षणअंतर्गत पाणवठे तयार करण्यासाठी प्राप्त निधीतून पाच लाख रूपयांचा खर्च केला जाणार आहे. वडाळी जंगलात सोलर ऊर्जेच्या हातपंपाचा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य ठिकाणी हा प्रयोग राबविला जाईल. यापूर्वी पोहरा-चिरोडी जंगलात हातपंप बसविण्यात आले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्यास मदत झाली आहे. (प्रतिनिधी)
स्वयंचलित असेल हातपंप
हे सोलर ऊर्जेवरील हातपंप स्वयंचलित राहणार असून त्यानुसार वनविभागाने निविदा देखील काढल्या होत्या. नामांकित कंपनीचे सोलर पंप असून हातपंपांचा दर्जा उत्तम राहणार आहे. नव्या प्रयोगामुळे वनकर्मचाऱ्यांवरील ताण देखील कमी झाला आहे.
एक सोलर सेट आणि हातपंप बसविले जाणार आहेत. त्याकरीता पाच लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पाणवठे तयार करण्यासाठी प्राप्त निधीतून सोलर ऊर्जेवर चालणारे हातपंप बसविले जाणार आहेत.
- नीनू सोमराज,
उपवनसंरक्षक, अमरावती.