सौर कृषिपंप उखडले, सर्वेक्षण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:12 IST2021-04-22T04:12:52+5:302021-04-22T04:12:52+5:30
स्वत: दुरुस्ती कुठवर करायची? वादळाने केले नुकसान, तालुक्यात ८०० हून अधिक संयंत्र नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात नुकत्याच येऊन गेलेल्या ...

सौर कृषिपंप उखडले, सर्वेक्षण नाही
स्वत: दुरुस्ती कुठवर करायची? वादळाने केले नुकसान, तालुक्यात ८०० हून अधिक संयंत्र
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात नुकत्याच येऊन गेलेल्या वादळाने काही सौर कृषिपंप सीमेंटच्या पायासह उखडले आहेत. त्यांच्या सुट्या भागांचे नुकसान झाले आहे. काही संयंत्रांचा गॅरंटी पीरियड अजून संपायचा आहे. त्यामुळे दुरुस्तीबाबत कंपनीला विचारणा केली असता, टोलवाटोलवी केली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. नुकसानाचे सर्वेक्षण तातडीने केले जावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सौर कृषिपंपाची यंत्रणा बिघडली. पहूर येथील नागोराव शिंदे यांच्यासह अमोल ठाकरे, नितीन काळे, शरद हिवसे आदी शेतकऱ्यांच्या शेतातील सौर ऊर्जेचे पॅनल वादळामुळे जमिनीवर कोसळले. फाऊंडेशन उखडले. अँगल तुटून पडले आहेत. या यंत्रणेची वायरिंग तुटली. पावसाळ्यापूर्वी हे संयंत्र दुरुस्त करून मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
-----------------
कंपन्यांकडून टोलवाटोलवी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ९०० च्या जवळपास सौर कृषिपंप संयंत्र आहेत. त्यांना स्थापित करताना विविध कंपन्यांकडून पाच वर्षांची गॅरंटी देण्यात आली आहे. हा गॅरंटी पीरियड संपायचा असल्याने नागोराव शिंदे यांचा मुलगा धनंजय शिंदे यांनी ऑनलाईन कम्प्लेंट टाकली तसेच फोन कॉल केले. मात्र, कुणीही नुकसानाची पाहणी करण्यास आले नाही. गतवर्षीदेखील किरकोळ दुरुस्तीसाठी त्यांनी स्वत:च्या खिशातील साडेतीन हजार रुपये खर्च केले होते. अशीच तक्रार तालुक्यातील बहुतांश सौर ऊर्जा कृषिपंपधारकांची आहे.
-----------------------
फोटो_पहूर येथील नागोराव शिंदे यांच्या शेतातील कृषी पंपाच्या सौर ऊर्जेचे पॅनल वादळामुळे जमिनीवर कोसळले.