कोमल म्हणते, कर्करोगच माझा ‘व्हॅलेंटाईन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2016 23:58 IST2016-02-12T23:58:55+5:302016-02-12T23:58:55+5:30

किशोरावस्था ओलांडून तारूण्यात पदार्पण करण्याचे तिचे वय. मोरपंखी दिवस...स्वप्नात हरवून जाण्याचे...स्वप्नातला राजकुमार शोधण्याचे..

Soft says cancer is my 'valentine'! | कोमल म्हणते, कर्करोगच माझा ‘व्हॅलेंटाईन’!

कोमल म्हणते, कर्करोगच माझा ‘व्हॅलेंटाईन’!

१० वर्षांपासून दररोज मृत्यूशी सामना : हट्टाने लढतेय जगण्याची लढाई
अमरावती : किशोरावस्था ओलांडून तारूण्यात पदार्पण करण्याचे तिचे वय. मोरपंखी दिवस...स्वप्नात हरवून जाण्याचे...स्वप्नातला राजकुमार शोधण्याचे...पण, अवघ्या १२ व्या वर्षी ‘तिच्या’ सोबतीला आला रक्ताचा कर्करोेग. नुसते नाव ऐकूनही गलितगात्र व्हावे, असा याचा धाक. पण, किशोरावस्थेपासून सोबतीला आलेल्या या 'कॅन्सर'ने तिचा हात घट्ट धरून ठेवलाय. आज ती २२ वर्षांची आहे. पण, आता हा भयंकर आजारच तिचा व्हॅलेंटाईन झालाय. ती म्हणते अखेरपर्यंत सोबत करणारी व्यक्ती म्हणजेच खराखुरा व्हॅलेंटाईन ना! मग, ‘या ब्लड कँसर’पेक्षा माझा अधिक जिवलग कोण असू शकतोे?
रक्ताच्या 'कॅन्सर'शी १० वर्षांपासून अखंड लढा देणाऱ्या वीरांगना ‘कोमल’ची ही कहाणी जशी हृदयस्पर्शी आहे तशीच प्रेरणादायी देखील. स्वत:च्या लहान-सहान दु:खांना कुरवाळून, त्यांचा बाऊ करून सहानुभूती मिळविणारे अनेक असतात. पण, दररोज मृत्यूशी दोन हात करून हसतमुखाने असह्य वेदना, दु:ख आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या अनेक क्लेशांचा सामना करणाऱ्या कॅन्सरग्रस्त कोमलसारखे विरळेच. म्हणूनच या शुरांगनेसाठी समाजाचा एक घटक म्हणून आपण काही तरी करावे. तिच्या वेदना काही अंशी कमी करण्याचा प्रयत्न तिच्या समवेत अनोखा 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करूनही आपण करू शकतो ना! प्रेमदिनाची ही अनोेखी भेट नक्कीच कोमलसाठी आल्हाददायक ठरेल.
कोमल म्हणते, जेव्हा एक-एक श्वास उसने घेऊन जगावे लागते ना, तेव्हाच जीवनाची खरी किंमत कळते.

हॉस्पिटलच तिचे घर
अमरावती : आतापर्यंत तिच्या चार किमोथेरपी झाल्या आहेत. किमोथेरपीचे उपचार म्हणजे जिवघेणी प्रक्रिया. जिवंतपणी मरणयातना भोगाव्या लागतात. पण, कोमल लढते आहे. मागील १० वर्षांपासून टाटा कॅन्सर हॉस्पिटल हे तिचे दुसरे घर झाले आहे. वेदनांनीही तिच्यापुढे हात टेकलेत.
कोमलच्या लढाईत ‘प्रयास सेवांकुर’ने येणारा व्हॅलेंटाईन डे ‘मानव प्रेमदिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. प्रेमदिनी शहरातील प्रमुख चौकांत सकाळी ९ ते १ यादरम्यान घराघरांतील रद्दी संकलन करून त्यातून येणारी रक्कम कोमलला प्रदान केली जाणार आहे. कोमलचा लढा सर्वांचा व्हावा हा यामागील उद्देश. सर्वांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अविनाश सावजी यांनी केले आहे.

कर्करोगाला रोखून शिक्षणाचा वसा
कर्करोगाशी एकहाती लढाई करणारी कोमल शिक्षणातही अव्वल आहे. दहावीत ८४ टक्के, बारावीत ८० टक्के आणि बीएससी चवथ्या सेमिस्टरमध्ये विद्यापीठात ती अव्वल आली आहे. सध्या ती बीएससीच्या अंतिम वर्षाला शिकतेय. तोंडात बोट घालावे, असा तिच्या प्रगतीचा आलेख आहे.

मी जगणार अन् कॅन्सरतज्ज्ञ होणार!
कोमल म्हणते, या लढाईत मी एकटी नाही. अनेकांनी जगण्याचे बळ दिले. वाचन, लिखाण, कथा, कवितांनी प्रेरणा दिली. आता तर मला जगायचेच आहे. मी डॉक्टर होणार आणि कॅन्सरने बाधित माझ्यासारख्या इतरांना नवजीवन देणार. हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे.

Web Title: Soft says cancer is my 'valentine'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.