‘सोफिया’मुळे रस्त्यांवर खड्ड्यांचे जाळे!
By Admin | Updated: October 30, 2014 22:44 IST2014-10-30T22:44:50+5:302014-10-30T22:44:50+5:30
नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत साकारण्यात आलेल्या इंडिया बुल्स कंपनीच्या सोफिया औष्णिक वीज प्रकल्पात वलगाव येथून दरदिवसाला शंभराहून अधिक ट्रकमधून कोळशाची वाहतूक होते.

‘सोफिया’मुळे रस्त्यांवर खड्ड्यांचे जाळे!
अमरावती : नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत साकारण्यात आलेल्या इंडिया बुल्स कंपनीच्या सोफिया औष्णिक वीज प्रकल्पात वलगाव येथून दरदिवसाला शंभराहून अधिक ट्रकमधून कोळशाची वाहतूक होते. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. सतत रस्ता दुरुस्ती करावी लागत असल्याने रेल्वे प्रशासनही हतबल झाले आहे.
सोफियामध्ये वीज निर्मिती सुरु झाली आहे. यासाठी लागणारा कोळसा वलगाव रेल्वेस्थानकावर मालगाडीने आणला जातो. कोळसा रेल्वे स्थानकावर उतरविल्यानंतर तो ट्रकव्दारे वलगाव येथून नांदगाव पेठ येथील सोफिया औष्णिक वीज प्रकल्पात पोहोचविला जातो. मात्र, ज्या मार्गावरुन हा कोळसा नेला जातो तो रस्ता सततच्या अवजड वाहतुकीमुळे ठिकठिकाणी उखडला आहे. ही बाब रेल्वे प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या नजरेसही आणून दिली. मात्र, वाहतुकीवर अंकुश लागलेला नाही. वलगाव रेल्वे स्थानकावरुन ट्रकमध्ये कोळसा भरला की तो पुढे रिंगरोडवर चांदूरबाजार मार्गे नांदगाव पेठ एमआयडीसीकडे पाठविला जातो. या गंभीर प्रकाराकडे प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी लक्षच देत नाहीत, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अमरावती ते अचलपूर मार्गावर वलगावनजीक रेल्वे पुलाचे बांधकाम सुरु आहे. सततच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेला वळण रस्ता नादुरुस्त झाला आहे. यापूर्वी चार ते पाच वेळा हा वळण रस्ता तयार करण्यात आला. मात्र, काही दिवसांनंतर हा रस्ता पुन्हा जैसे थे होतो.
वळण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रेल्वेकडे आर्थिक तरतूद नसल्याने हा वळण रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करता येत नसल्याची माहिती आहे. यापूर्वी रेल्वेच्या बांधकाम कंत्राटदाराने दोनदा या रस्त्याची दुरुस्ती केली. मात्र, ओव्हरलोड वाहतूक कमी करण्यासाठी प्रशासन मदत करीत नसल्याने सोफिया औष्णिक वीज प्रकल्पात कोळसा वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांचे फावत आहे. वलगाव रेल्वे स्थानक परिसराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची ओव्हरलोड ट्रक वाहतुकीमुळे अक्षरश: चाळणी झाली असताना ही बाब इंडिया बुल्स कंपनीचे अधिकारी गांभिर्याने घेत नाहीत, हे खरे आहे. पावसाळ्यापूर्वीच लाखो रुपये खर्चून वलगाव रेल्वे स्थानक मार्ग आणि अचलपूर मार्गावरील रेल्वे पूलाचे बांधकाम करण्यात आले. वळण मार्गाची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, अवजड वाहतुकीमुळे या रस्त्यांची पूरती वाट लागली आहे. क्षमतेपेक्षा जास्त कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांविरुद्ध कारवाईची मागणी रेल्वे प्रशासनाने केली आहे. या मार्गावरील अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता या रस्त्यावरील कोळशाची ओव्हरलोड वाहतूक बंद करणे अत्यंत गरजेचे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.