शाळा प्रवेशासाठी आता सोशल मीडियाचा वापर
By Admin | Updated: May 6, 2015 23:58 IST2015-05-06T23:58:03+5:302015-05-06T23:58:03+5:30
अलीकडे सोशल मीडिया एक प्रभावी माध्यम झाले आहे. त्या माध्यमाचा उपयोग सध्या सर्वत्र होत आहे.

शाळा प्रवेशासाठी आता सोशल मीडियाचा वापर
नवीन प्रयोग : जिल्हा परिषद शाळांतील मुलींची गळती रोखण्यासाठी उपाययोजना
अमरावती : अलीकडे सोशल मीडिया एक प्रभावी माध्यम झाले आहे. त्या माध्यमाचा उपयोग सध्या सर्वत्र होत आहे. त्यामुळेच सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या प्रवेशाच्या जाहिराती या मीडियावर झळकू लागल्या आहेत. पाटी पुस्तक आणि पेन्सिलच्या पुढे जात जिल्हा परिषदेच्या शाळांनी व शिक्षकांनी शाळा प्रवेशासाठी आॅडिओ व व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.
यामुळे ग्रामीण भागातील पालकांना शाळांमधून शिक्षणाबरोबरच मूल्यशिक्षणासह विविध शासकीय लाभांची माहिती मिळण्यास मदत होत आहे. इतकेच नव्हे तर यात सोशल मीडियाचा अतिशय खुबीने वापर करणाऱ्या शिक्षण विभागप्रमुखांच्या कल्पकतेचा बोलबाला दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षकांना त्यांच्या शाळेची उत्तम जाहिरात करण्याची संधी मिळाली आहे. पाल्यांचे प्रवेश जिल्हा परिषद शाळांमध्ये करण्यासाठी पालकांना प्रेरित करणारे ‘बोल’ या जाहिरातींच्या ‘क्लिप्स’मध्ये वापरण्यात आले आहे. ही गीते सर्वांनाच भुरळ घालत आहे. ‘आई तुझ्या दारात, सर आलेत, मॅडम आल्या, जिल्हा परिषद शाळा आमची छान, आम्ही रोज शाळेला जाणार, जिल्हा परिषद शाळेला चाललो आम्ही, आमचे गाव आमची शाळा, आम्हाला लावते खूप खूप लळा’, ही गीते लक्षवेधी ठरू लागली आहेत.
जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील बहुतांश शिक्षक गुणवत्तावाढीसाठी कितीतरी आगळे उपक्रम राबवितात. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मोफत गणवेश, पाठ्यपुस्तक लेखन साहित्य, स्वाध्यायिका शाळांमध्ये पुरवितात. समाज सहभागातून अनेक शाळांचे रुप बदलले आहे. ई-लर्निंग, हरित शाळा टोबॅको फ्री स्कूल, पर्यावरणस्नेही शाळा, बोलक्या भिंती असे उपक्रम जिल्ह्यातील शाळांमध्ये राबविले जात आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रम, वार्षिक महोत्सव, विविध स्तरावर विविध अभियान स्पर्धा परीक्षा वर्ग, राष्ट्रीय सण व उत्सव असे उल्लेखनीय कार्य केले जात आहे. चित्रकला, प्रश्नमंजूषा विविध गुणदर्शन, संगीत स्पर्धा, कविता, साहित्य दर्शन विविध प्रदर्शनी, परिसर भेटी या शाळांमधून राबविल्या जाऊ लागल्या आहेत.
शिक्षक अशा उपक्रमांच्या जाहिराती करीत नसल्याने शाळांमधील विद्यार्थी संख्या रोडावल्याचे चित्र काही वर्षांत दिसू लागले होते. मात्र, अलीकडे शिक्षक या उपक्रमांची प्रसिध्दी सोशल मीडियावर करु लागल्याने या जाहिराती पालकांपर्यंत पोहोचू लागल्या आहेत. पालकांचा दृष्टिकोन यामुळे बदलू लागला आहे. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्यादेखील वाढू लागली आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये वर्षभर राबविलेले उपक्रम त्यांच्या छायाचित्रांची सुरेख गुंफण करीत तयार केलेले ‘व्हिडीओ क्लिपिंग’ सध्या सोशल मीडियाद्वारे हजारोे लोकांपर्यंत पोहोचत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक नवीन उपक्रम राबविले जातात. त्या उपक्रमांची शाळांनी सोशल मीडियावर माहिती दिल्याने शाळांची पटसंख्या वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांनी सोशल मीडियावर अशा प्रकारे जाहिरात केली असून या जाहिराती लोकप्रिय ठरत आहेत.
- श्रीराम पानझाडे,
प्राथमिक शिक्षणाधिकारी, अमरावती.