-म्हणून ‘ती’ चूक क्षम्य ठरते काय ?
By Admin | Updated: April 10, 2017 00:16 IST2017-04-10T00:16:58+5:302017-04-10T00:16:58+5:30
दहा महिन्याच्या आरूष नागापुरेवर डॉक्टरने चुकीची शस्त्रक्रिया केल्याचे शनिवारी उघड झाले. त्यामुळे त्याच्या पुढील उपचाराचा सर्व खर्च करण्याची डॉक्टरने दर्शविली आहे.

-म्हणून ‘ती’ चूक क्षम्य ठरते काय ?
चुकीच्या शस्त्रक्रियेचे प्रकरण : उपचाराचा सर्व खर्च करणार डॉक्टर
अमरावती : दहा महिन्याच्या आरूष नागापुरेवर डॉक्टरने चुकीची शस्त्रक्रिया केल्याचे शनिवारी उघड झाले. त्यामुळे त्याच्या पुढील उपचाराचा सर्व खर्च करण्याची डॉक्टरने दर्शविली आहे. रूग्ण व डॉक्टरांच्या सामंजस्यामुळे हेप्रकरण निवळले. मात्र, रूग्णाच्या नातलगांनी डॉक्टरविरूद्ध तक्रार केली नाही, म्हणून त्यांची चूक क्षम्य ठरू शकते का, असे प्रश्न जागरूक अमरावतीकर विचारत आहेत.
चिमुकल्या आरूष नागापुरेच्या डोळ्यावरील भुवईवर एक छोटीशी गाठ आल्याने नागापुरे दाम्पत्याने त्याला खासगी रूग्णालयात नेले. तपासणीनंतर ‘आस्था’ रूग्णालयाचे जनरल सर्जन अभिजित देशमुख यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया विभागात आरूषला नेल्यानंतर देशमुख यांनी गाठीची शस्त्रक्रिया न करता चक्क त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया केली.
ही गंभीर चूक नागापुरे दाम्पत्याच्या निदर्शनास येताच त्यांनी डॉक्टरांना जाब विचारला. त्यानंतर हेप्रकरण वाऱ्यासारखे शहरात पसरले.
आरुषच्या वेदना जीवघेण्या
अमरावती : डॉ.देशमुख यांनी सुरूवातीला चुकीची शस्त्रक्रिया झाल्याचे कबूल केले नव्हते. मात्र, नातेवाईकांचा रोष वाढत असल्याचे पाहून त्यांनी चुकीची कबुली देऊन माफी मागितल्याचे योगेश नागापूरेचे म्हणणे आहे. आरूषवरील पुढील सर्व उपचार मोफत करण्याचे आश्वासन डॉक्टरांनी नागापुरे दाम्पत्यांना दिले. त्यामुळे आता हे प्रकरण शांत झाले. एकीकडे डॉक्टरांवर हल्ले होताहेत त्यामुळे सुरक्षा प्रदान करा, अशी ओरड डॉक्टर करतात. मात्र, डॉक्टरांनीच आत्मपरीक्षण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अशा गंभीर चुका जर डॉक्टरांकडून होत असतील तर रूग्णांच्या नातलगांचा आक्रोश वाढणारच, अशा प्रतिक्रियाही उमटत आहेत. चिमुकल्या आरूषला डॉक्टरांच्या चुकीमुळे ज्या वेदना सहन कराव्या लागत आहेत, त्यांची भरपाई डॉक्टर कशी करणार?, त्या वेदनांची जाणीव केवळ नागापुरे दाम्पत्यालाच असू शकते. इवल्याशा आरूषच्या वेदना पाहून त्याच्या आई-वडिलांनी डॉक्टरविरूद्ध तक्रार न करण्याचा निर्णय घेतला. आधी आरूष कसा बरा होईल, याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, नागापुरे दाम्पत्याने तक्रार केली नाही म्हणून डॉक्टरांची चूक क्षम्य ठरू शकत नाही, हेदेखील तेवढेच खरे आहे.