कृषी विज्ञान केंद्राचा उपक्रम : १२ हजार शेतकऱ्यांना वर्षाला चार लाख संदेशगजानन मोहोड - अमरावतीभारतीय हवामान खाते विभाग, नवी दिल्ली, कृषी हवामान विभाग पुणे, कृषी विद्यापीठ अकोला व नाबार्ड पुणे यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूरद्वारा जिल्ह्यातील १२ हजारांवर शेतकऱ्यांना कृषी मार्गदर्शन, हवामानाचा अंदाज, बाजारभाव, पिकानुसार कीड व रोग व्यवस्थापन यासह इतर माहिती वर्षाला चार लाख ‘एसएमएस’ द्वारे मोफत पुरविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी राज्यातील १० कृषी विज्ञान केंद्रांची निवड करण्यात आली. त्यापैकी हे एक केद्र आहे. या मोफत संदेश सेवेमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या कृषीविषयक तांत्रिक माहिती प्राप्त होत आहे. शासनाच्या संयुक्त उपक्रमातील या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १००० शेतकऱ्यांचे एक मंडळ असे ५० मंडळ स्थापित करण्यात आले आहे. असे ५००० शेतकरी व एका खासगी कंपनीच्या सहकार्याने ७००० असे एकूण १२ हजार शेतकऱ्यांना ही संदेश सेवा दिली जात आहे. या उपक्रमासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाद्वारा दर आठवड्यात मंगळवार व शुक्रवारी या उपक्रमासाठी महत्त्वपूर्ण असणारी माहिती कृषी विज्ञान केंद्राला पाठविली जाते व या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना आवश्यक असणारी माहिती शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे पाठविली जाणार आहे. या उपक्रमासाठी मंडळस्तरावर कार्यालय सुरू करण्यात आले आहे. अन्य शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी या कार्यालयाबाहेरील फलकावरदेखील माहिती लिहिली जात आहे. हवामान अंदाजाची माहिती पेरणीपूर्व मिळत असल्याने शेतकऱ्यांना या उपक्रमाचा फायदा होतो. तसेच नियमित बाजारभावाची माहिती मिळत असल्यामुळे बाजारात विक्रीसाठी माल केव्हा न्यायचा याची माहिती होते. शेती पीक विषयक मार्गदर्शन, पिकावरील किड नियंत्रण व व्यवस्थापनाची माहिती मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. दर तीन महिन्याला बैठकया उपक्रमासाठी तीन महिन्यांतून एक वेळ ‘पीएमआयसी’ (प्रोजेक्ट मॉनिटरींग रेळू कमेटी) घेतली जाते. या बैठकीला नाबार्डचे डीडीएम, लीड बँकेचे एलडीएम (लिड डेव्हलपमेंट मॅनेजर) व एफएलसीएम (फॉयनान्सशियल लिटरसी क्रेडिट काऊंसीलर) कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शेतकरी व कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक राहतात. बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणे, निराकरण करणे व पुढील तीन महिन्यात होणाऱ्या कामांवर चर्चा झाली.
कृषी सल्ल्यासह हवामान बदलाचा शेतकऱ्यांना ‘एसएमएस’
By admin | Updated: July 7, 2014 23:21 IST