एसटी महामंडळाद्वारे प्रवाशांची मुस्कटदाबी

By Admin | Updated: July 2, 2015 00:25 IST2015-07-02T00:25:57+5:302015-07-02T00:25:57+5:30

एसटी बसचा प्रवास त्रासदायक असला तरी प्रवासीवर्ग याविरोधात आवाज उचलत नसल्याने एसटी महामंडळाचे चांगलेच फावले आहे.

Smile of passengers by ST Corporation | एसटी महामंडळाद्वारे प्रवाशांची मुस्कटदाबी

एसटी महामंडळाद्वारे प्रवाशांची मुस्कटदाबी

सुविधांचा प्रचंड अभाव : गैरसोयींबद्दल तक्रार करायची तरी कुठे?
सुनील देशपांडे अचलपूर
एसटी बसचा प्रवास त्रासदायक असला तरी प्रवासीवर्ग याविरोधात आवाज उचलत नसल्याने एसटी महामंडळाचे चांगलेच फावले आहे. या गैरसोयींबद्दल एखाद्या सामान्य प्रवाशाने आवाज उचलला तरी तो पध्दतशिरपणे बंद केला जातो. त्यामुळे प्रवाशांना मरणयातनांबद्दल कुणीही ‘ब्र’ काढायला तयार नाही.
भाजप-शिवसेना युतीचे सरकार राज्यात सत्तारुढ होऊन एक वर्ष झाले. सर्वसामान्य माणसाला चांगले दिवस येतील असे आश्वासन देणाऱ्या या सरकारने प्रवाशांना अद्याप अच्छे दिन आणण्याच्या दृष्टीने पावले उचललेली नाहीत. परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते या खात्याचे मंत्री आहेत. यापूर्वी त्यांचा अमरावती जिल्ह्याशी दांडगा संपर्क होता. या जिल्ह्याच्या समस्यांचा त्यांना चांगला अभ्यास आहे.
मात्र, त्यांनी अजुनही काही ठोस पाऊल उचललेले दिसत नाही. आश्वासनांशिवाय त्यांचेकडून काहीच मिळत नाही. केवळ नवनवीन घोषणा करुन प्रवाशांना झुलवत ठेवण्याचा उद्योग हे सरकार करीत आहे, असा आरोप प्रवाश्यांकडून होत आहे.
आगाराला नवीन गाड्या देण्याचे नुसते आश्वासन दिले जाते. परंतु अद्याप नवीन गाड्या आलेल्या नाहीत. तांत्रिक विभागात रिक्त झालेली पदे भरली जात नसल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम करायला लावून वेळ मारुन नेली जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून होतो आहे. एसटीतील रिक्त जागा भरण्याची मागणी केली जात आहे.

फुटक्या खिडक्या
फाटलेले टायर
आगारातील गाड्यांची अवस्था भंगार आहे. बहुतांश गाड्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत. काही खिडक्यांची दारे जाम झाल्याने त्या सरकत नाहीत. टायर व गाडीतील आॅईलचा दर्जा सुमार आहे. त्यामुळे त्या कधी बंद पडतील याचा नेम नाही. दुसरीकडे या गाड्यांच्या वेगावरही मर्यादा घालून दिल्याने साध्या मिनी ट्रकलाही ओव्हरटेक करताना चालकाला कसरत करावी लागते. आॅटोसारखाच या गाड्यांचा वेग असल्याने एका तासाच्या प्रवासासाठी दीड ते दोन तास लागतात. याकडे लक्ष देण्याची मागणी प्रमोद भोंडे, किशोर मोहोड, गजानन मेहरे, अमोल सुरटकर, संदीप देंडव, प्रितेश अवघड, विवेक महल्ले यांचेसह आदी प्रवाशांनी केली.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या त्यामुळे डिझेलचे दरही कमी झाले. परंतु प्रवाशांना उत्तम सुविधा न देता आधीप्रमाणेच तिकिट दर आकारले जात आहेत. उलट चिल्लर पैशांची वाढ करून बस वाहकाला कमाईची संधी या सरकारने मिळवून दिली असे म्हटल्यास चूक ठरणार नाही.
- मनीष अग्रवाल
सामाजिक कार्यकर्ता.

शासनाने ६५ वर्षांवरील नागरिकांना प्रवास भाड्यात ५० टक्के सूट दिली. परंतु ही सूट मिळविण्यासाठी अनेकांनी बनावट कार्ड बनवून घेतले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एसटीमधून ७० टक्के बोगस वृध्द प्रवासी प्रवास करताना दिसून येतात. कसून चौकशी झाल्यास बोगस वयोवृध्द उघडे पडतील, त्यांना प्रमाणपत्र देणारे रॅकेटही पकडले जाईल. टप्प्याटप्प्याने हे सरकार सुविधा करीत आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते देखील एसटीमध्ये सुधारणा घडवून आणतील यात शंका नाही.
- ओमप्रकाश दीक्षित
माजी उपजिल्हाप्रमुख, शिवसेना.

Web Title: Smile of passengers by ST Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.