नाथजोगींच्या चेहऱ्यावर हास्य
By Admin | Updated: January 9, 2017 00:18 IST2017-01-09T00:18:22+5:302017-01-09T00:18:22+5:30
कुडाच्या भिंती अन् ताडपत्रीच्या छतात जीवन कंठत अठराविश्वे दारिद्र्य पाचवीला पुजलेल्या नांदगाव तालुक्यातील...

नाथजोगींच्या चेहऱ्यावर हास्य
अंत्योदय योजना : २८ वर्षांनंतर पुरवठा विभागाने दिला आधार
मनोज मानतकर नांदगाव खंडेश्वर
कुडाच्या भिंती अन् ताडपत्रीच्या छतात जीवन कंठत अठराविश्वे दारिद्र्य पाचवीला पुजलेल्या नांदगाव तालुक्यातील हिवरा मुरादे येथील ४० नाथजोगी समाजाच्या कुटुंबीयांच्या जीवनात २८ वर्षांनंतर अंधारलेल्या वाटेत उजेड निर्माण झाला. ही किमया घडवून आणण्यात पुरवठा निरीक्षक गजानन भेंडेकर यांची फार मोठी मोलाची साथ लाभली. पुरवठा विभागाने अंत्योदयचा आधार दिल्याने नाथजोगी कुटुंबीयांचा उपजिविकेचा फार मोठा प्रश्न सुटला.
हिवरा मुरादे येथे वास्तव्यास असलेल्या नाथजोगी कुटुंबीयांची स्थिती फार विदारक आहे. कुटुंबीयांच्या पोटाची खळगी भागवण्यासाठी या नाथजोगी कुटुंबीयांमधील कर्ता पुरुष वणवण भटकंती करतो, तर या कुटुंबामधील महिला गवताची पेंडी गोळा करतात, तेव्हा कुठे रात्रीची चूल पेटते. या नाथजोगी कुटुंबीयांकडे अद्यापपर्यंत आधारकार्ड नाही. राशन कार्ड नाही. फक्त मतदानाचा हक्क बजावण्यापुरते मतदान कार्ड यांचेकडे आहेत. अद्यापपर्यंत त्यांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळाला नाही. राजकारणासाठी मतदानापुरतेच नाथजोगी कुटुंबीयांच्या वस्तीचा वापर झाला आहे. अद्यापही या वस्तीतील चुली उघड्यावरच पेटते आहे. परंतु हे विदारक दृश्य कुणाच्याही नजरेस येऊ नये, ही शोकांतिका आहे. या वस्तीत विद्युत पुरवठा नाही, पाण्याची व्यवस्थाही नाही, ये-जा करताना चिखलातून वाट काढावी लागते, साधे रस्तेसुद्धा नाहीत. या वस्तीतील नागरिकांना शिक्षणाचा साधा गंधही नाही. ४० ते ५० लहान मुले या वस्तीत आहेत. त्यापैकी फक्त ५ मुले शाळेत जातात. या वस्तीतील कुठलाही व्यक्ती शिक्षित नसल्याने फार मोठ्या अडचणींचा सामना येथील नागरिकांना करावा लागतो. शिक्षण महर्षींच्या तालुक्यात वास्तव्यास असतानासुद्धा या वस्तीतील मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते, हे न सुटणारे कोडेच आहे. फार मोठ्या समस्येच्या विळख्याने या वस्तीला घेरले असताना उपजीविकेसाठी आवश्यक असणारे शासकीय स्वस्त धान्य २८ वर्षांनंतर का होईना पण, उपजिविकेचा प्रश्न अधिक प्रमाणात मिटल्याचा खरा आनंद नाथजोगी कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत आहे. पुरवठा विभागाने दारिद्र्याच्या बहुपाशात अडकलेल्या या वस्तीचा शोध घेत या नागरिकांच्या वस्तीत जाऊन अंत्योदय कार्डाचे वाटप केले. यामध्ये ईश्वर मांडवकर, धरमनाथ मांडवकर, उमेश मांडवकर, हिंमत मांडवकर, लक्ष्मण मांडवकर, रामराव शिंदे, बाळू पवार, संजय पवार, राजेश तांबुळकर, प्यारेलाल पवार, नारायण मांडवकर, अजाब शिंदे, अंबादास मांडवकर, किसन सनिशे, सुरेश मांडवकर, पंजाब शिंदे, राजेश शिंदे, सुभाष शिंदे, गौकर्णा शिंदे, गणेश मांडवकर, भाऊराव मांडवकर, नारायण तांबे, संतोष पवार, रामराव शिंदे, भगवान तांबुळकर, गणेश तांबूळकर, भाऊराव शिंदे, सुनील पवार, अनिल मांडवकर, भगवान मांडवकर, पांडुरंग मांडवकर, सागर पवार, कांता पवार, सुरेश पवार, माया शिंदे, जगन्नाथ शिंदे, रमेश मांडवकर या नागरिकांना अंत्योदयचा लाभ मिळणार आहे. अन्नाचा कण आमच्या पोटात जाणे हीच आमच्यासाठी फार मोठी उपलब्धी आहे, असे या वस्तीतील नागरिकांनी सांगितले.
अंधाच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू
पुरवठा विभागाचे अधिकारी आपल्या वस्तीत आले असताना जीवन जगण्यास आधार दिला, असे शब्द कानी पडताच अंध उमेश मांडवकरच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले व साहेब तुमचे आभार, असे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडले. तसेच ५० वर्षांपासून शाहिरी करीत समाजप्रबोधन करणारा शाही बाळू शंकर पवार याच वस्तीतील असून एकीकडे अंत्योदयचा लाभ मिळाल्याचा आनंद या शाहिराला झाला, तर दुसरीकडे निवाऱ्याअभावी जीवन जगताना वस्तीतील नागरिकांची होत असलेल्या अवहेलनाबाबत खंत व्यक्त करताना या शाहिराची वाणीही स्तब्ध झाली.
पुरवठा निरीक्षक भारावले
जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार व पुरवठा विभागातील माझे सहकारी या सर्वांच्या सहकार्यामुळेच खऱ्या गरजवंतांचा शोध घेऊन त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ देता आला, अशी प्रतिक्रिया तालुका पुरवठा निरीक्षक गजानन भेंडेकर यांनी दिली. या सामाजिक उपक्रमाने ते भारावले.