स्मार्टसिटीचा घाण चेहरा !

By Admin | Updated: July 27, 2016 00:02 IST2016-07-27T00:02:13+5:302016-07-27T00:02:13+5:30

आठ लाख अमरावतीकरांचे आरोग्य निरामय रहावे, यासाठी महापालिका वर्षाकाठी तब्बल १३ कोटी रुपये खर्च करते. तथापि कोट्यवधींचा खर्च होऊनही महानगराचा चेहरा मात्र अस्वच्छच आहे.

Smartcity dirty face! | स्मार्टसिटीचा घाण चेहरा !

स्मार्टसिटीचा घाण चेहरा !

४३ कंत्राटदार : स्वच्छतेवर १३ कोटींचा खर्च 
अमरावती : आठ लाख अमरावतीकरांचे आरोग्य निरामय रहावे, यासाठी महापालिका वर्षाकाठी तब्बल १३ कोटी रुपये खर्च करते. तथापि कोट्यवधींचा खर्च होऊनही महानगराचा चेहरा मात्र अस्वच्छच आहे.
अन्य ऋतुंच्या तुलनेत पावसाळ्यात स्वच्छता विभागाच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या फेरीत स्वत:ला ‘प्रोजेक्ट’ करणाऱ्या अमरावती महानगराचा चेहरा घाणीने बरबटलेला आहे. शहरात सर्वदूर साचलेले कचऱ्याचे ढीग, त्यावर ताव मारणारी डुकरे, तुंबलेल्या नाल्या आणि गटारी हे चित्र स्वच्छता आणि आरोग्याचा बोजवारा उडाल्याचे दर्शक आहे. महापालिकेच्या ४३ प्रभागात ४३ कंत्राटदारांच्या ११४६ आणि महापालिकेचा सेवेत असलेल्या सफाई कामगारांकडून शहराची साफसफाई करण्यात येते. मात्र, मुस्लिमबहूल क्षेत्र आणि झोपडपट्टीत कधीही कचरा संकलनाची रिक्षा फिरत नाही. इतवारा बाजारातील भाजीपाला मार्केटमधील लाईनमध्ये मृत वराह आणि स्वच्छतेचा उडालेला बोजवारा यंत्रणेवर दोषारोप करणाराच आहे. महापालिकेच्या अखत्यारितील ४३ प्रभागात कमी-अधिक प्रमाणात स्वच्छतेची बोंबाबोंब आहे. प्रत्येक प्रभागात कंत्राटदारांच्या कामगारांसह महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी कार्यरत असताना सुद्धा घाणीने कळस गाठला आहे.
कंत्राटदार आणि स्वच्छता कामगारांवर १३ कोटींहून अधिक रक्कम खर्च होत असली तरी अमरावतीकरांना यातून केवळ आजारच मिळतात. इतवारा बाजार व मुस्लिमबहूल परिसरातील परिस्थिती तर अत्यंत विदारक आहे. या भागातील कचरा महिनोन्महिने उचलला जात नाही.

टक्केवारीमुळे अभय
अमरावती : सफाई कंत्राटदाराला महापालिका महिन्याकाठी २ लाख ५६ हजार रुपयांचा मोबदला देण्यात येतो. महिन्याकाठी ही रक्कम १ कोटी १० लाखांपर्यंत जाते. त्यामुळे शहर स्वच्छ असणे अपेक्षित आहे. मात्र, कंत्राटदारांची मनमानी व संबंधितांशी आर्थिक लागेबांधे यामुळे अस्वच्छतेवर कुणीही बोलायला तयार नाही. एकंदरीतच स्वच्छतेबाबतचा कंत्राट आणि अन्य बाबींमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने बहुतांश खासगी कंत्राटदारांना टक्केवारीमुळे अभय दिल्याचा आरोप सर्वश्रुत आहे.

Web Title: Smartcity dirty face!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.