‘ई-स्विपिंग रिक्षा’द्वारे आता शहराची ‘स्मार्ट’ सफाई
By Admin | Updated: December 16, 2015 00:06 IST2015-12-16T00:06:44+5:302015-12-16T00:06:44+5:30
शहराची ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू झाली असताना आता सफाईसाठी ‘ई स्विपिंग रिक्षा’चा वापर केला जाणार आहे.

‘ई-स्विपिंग रिक्षा’द्वारे आता शहराची ‘स्मार्ट’ सफाई
महापौर, आयुक्तांकडून पाहणी : बॅटरीवर चालणार, पुणे येथील कंपनीने सादर केले प्रात्यक्षिक
अमरावती : शहराची ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू झाली असताना आता सफाईसाठी ‘ई स्विपिंग रिक्षा’चा वापर केला जाणार आहे. ही रिक्षा स्प्रेपंप, स्वच्छतागृहाची साफसफाई, साचलेले पाणी काढणे, वृक्षांना पाणी देणे, घाण साफ करणे अशा विविध कामांसाठी उपयोगी पडणार आहे. मंगळवारी या रिक्षाची महापौर, आयुक्तांनी पाहणी करून प्रथमदर्शी होकार दर्शविला आहे.
पुणे येथील एका कंपनीने ‘मॅक्सी क्लिन ई कार्ट’ या नावाने ‘ई-स्विपिंग रिक्षा’ तयार केली आहे. या रिक्षाचे प्रात्यक्षिक मंगळवारी पार पडले. यावेळी महापौर चरणजितकौर नंदा, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, पक्षनेता बबलू शेखावत, भाजपचे गटनेता संजय अग्रवाल, नगरसेवक दिनेश बूब, दिगंबर डहाके, नगरसेविका नीलिमा काळे, माजी नगरसेवक लकी नंदा आदींनी या रिक्षाची पाहणी केली. या रिक्षाला इंधनाचा कोणताही खर्च लागणार नाही. ही रिक्षा बॅटीरवर चालणार आहे. विद्युत अथवा सायकलद्वारे रिक्षाची बॅटरी चार्ज करता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या रिक्षाची निर्मिती मल्टिपर्पज वापराच्या अनुषंगाने करण्यात आल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ती वापरायोग्य राहील, असा विश्वास आयुक्त गुडेवार यांनी व्यक्त केला आहे. ही ‘ई-रिक्षा’ प्रदूषण विरहित असून ती गल्लीबोळातही सहजतेने ने-आण करता येणार आहे. या रिक्षेचे प्रात्यक्षिक केदार पाठक, अविनाश निमिनकर, महेश खोपाडे, प्रसाद जोशी यांनी सादर केले. ‘ई-रिक्षे’बाबत औत्सुक्य आहे. (प्रतिनिधी)
‘स्मार्ट सिटी’साठी पूरक उपक्रम
स्मार्ट सिटी उपक्रमात ई-स्विपिंग रिक्षा पूरक ठरतील. या रिक्षाला हाताळताना फारसे मनुष्यबळ लागणार नाही. शहराची सद्यस्थिती बघता स्वच्छतेसाठी ही रिक्षा लाभदायक ठरेल, अशी आशा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी व्यक्त केली आहे. स्वच्छतेसाठी नवनवीन उपक्रमांच्या अनुषंगाने ही रिक्षा खरेदी केल्यास इंधनाची बचत होऊन खर्चात कपात होईल, असेही आयुक्त गुडेवार यांनी यावेळी सांगितले. हा विषय स्थायी समितीपुढे मांडला जाणार आहे.