‘स्मार्ट सिटी’त नागरिकांचे मोबाईल होणार 'कनेक्ट'
By Admin | Updated: January 4, 2015 23:03 IST2015-01-04T23:03:22+5:302015-01-04T23:03:22+5:30
महापालिका अमरावती शहराला ‘स्मार्ट सिटी’त समाविष्ट करण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा नागरिकांना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच श्रृंखलेत एम मित्र नावाच्या अॅप्सचा अंगीकार करुन

‘स्मार्ट सिटी’त नागरिकांचे मोबाईल होणार 'कनेक्ट'
अमरावती : महापालिका अमरावती शहराला ‘स्मार्ट सिटी’त समाविष्ट करण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा नागरिकांना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच श्रृंखलेत एम मित्र नावाच्या अॅप्सचा अंगीकार करुन महानगरातील साडेआठ लाख नागरिकांना मोबाईलच्या माध्यमातून 'कनेक्ट' केले जाणार आहेत.
प्रत्येकवेळी महापालिकेत येऊन समस्या, तक्रार देणे हे काही सर्वांना संयुक्तीक नाही. त्यामुळे महापालिका आणि नागरिक यांच्यात क्षणात सुसंवाद साधता यावा, याकरिता ‘स्मार्ट सिटी’ला साजेसा असा नवा उपक्रम आयुक्त अरुण डोंगरे यांच्या संकल्पनेतून साकारला जात आहे. यात आपत्कालीन व्यवस्था, अग्निशमन, अपघात, स्वच्छता, मार्गदर्शन, पर्यटन, अॅम्बुलन्स सेवा, सर्प मित्र, वैयक्तिक सुरक्षा, रस्त्याचे अंतर, मार्गाचे नाव आदी नागरिकांशी संबंधित सेवेला प्राधान्या दिले जाणार आहे.
या नव्या प्रयोगाने मेट्रोपॉलिटन शहरात मिळणाऱ्या सुविधा अमरावतीत मिळणे सुकर होईल. विकासकामे करताना काही भागात नागरिकांच्या आवश्यकतेनुसार ती कामे करावी, अशा सूचना करण्याचे या अॅप्समध्ये अंतर्भूत राहणार आहेत. परिणामी एखाद्या भागात रस्ता निर्माण करणे अतिशय गरजेचे आहे, हे मोबाईलद्वारेच मार्गदर्शनातून आयुक्तांना क्षणात कळविण्याची या उपक्रमात व्यवस्था राहणार आहे. थेट महापालिकेत येऊन तक्रार करण्याची आता भानगड राहणार नसून नागरिकांकडे असलेल्या मोबाईलमधूनच एका क्लिकने तक्रार देता येणार आहे.
नागरिकांना या सुविधांचा कोणताही खर्च लागणार नाही, हे विशेष. ही प्रणाली वर्धा येथील लॉजिक सिस्टिम प्रा. लि. ने तयार केली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतही विकसित करण्यात आली आहे.
विशेषत: शहरातील पर्यटनक्षेत्र आणि प्राचीन मंदिरांची माहिती दर्शविणारे जागोजागी फलक लावले जाणार आहे. हे फलक लावताना त्या स्थळांचे कि.मी. दर्शविणारे अंतर शहराच्या ठिकठिकाणी राहणार आहेत. रस्ता, मार्ग ठळकपणे नमूद केले जाणार असून पर्यटकांना काहीच विचारण्याची गरज राहणार नाही, अशी सुविधा ‘स्मार्ट सिटी’ या उपक्रमात राहणार आहे.