शुक्रवारी ठरणार स्मार्ट सिटीचा चेहरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 00:40 IST2016-11-04T00:40:27+5:302016-11-04T00:40:27+5:30
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अनिवार्य असणाऱ्या एसपीव्ही (स्पेशलपर्पज व्हेईकल) या शासकीय कंपनीची

शुक्रवारी ठरणार स्मार्ट सिटीचा चेहरा
एसपीव्हीची बैठक : ५० कोटींचा निधी मिळणार
अमरावती : स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अनिवार्य असणाऱ्या एसपीव्ही (स्पेशलपर्पज व्हेईकल) या शासकीय कंपनीची दुसरी बैठक ११ नोव्हेंबरला महापालिकेत होत आहे. संचालक मंडळाच्या याबैठकीत पहिल्या हप्त्यात मिळणाऱ्या ५० कोटी रूपयांचे नियोजन केले जाणार आहे. ‘पॅनसिटी’ अंतर्गत हे ५० कोटी खर्च केले जाणार आहेत.
राज्य उच्चाधिकार समितीने स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवडलेल्या ८ शहरांमध्ये राज्यस्तरावर स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यास नगरविकास विभागाने ४ महिन्यांपूर्वी मंजुरी दिली. याआठमध्ये अमरावती महानगराचा समावेश होता. स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यासाठी ‘सिडको’ ही एजन्सी अमरावती महापालिकेला १०० कोटी रूपयांचे अनुदान देणार आहे. मात्र, तत्पूर्वी विशेष उद्देश वाहन ‘एसपीव्ही’चे गठन करण्याचे बंधन घालण्यात आले होते. एसपीव्हीच्या स्थापनेनंतरच ५० कोटींचा पहिला हप्ता ‘रिलिज’ करण्यात येणार असल्याने आॅक्टोबरमध्ये नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यीय संचालक मंडळाच्या ‘एसपीव्ही’ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर ५० कोटींचा पहिला हप्ता मिळविण्याचा मार्ग प्रशस्त झाला. त्याअनुषंगाने ११ नोव्हेंबरला ‘एसपीव्ही’च्या संचालक मंडळाची बैठक होत आहे. पॅनसिटी संकल्पेनुसार शहराच्या विकासासाठी नियोजन केले जाणार आहे. पोरवाल यांच्यासह महापौर, स्थायी समिति सभापती, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, नगररचना विभागाचे सहायक संचालक निर्मला बोरकर व तुषार भारतीय यांच्यासह कंपनीचे सीईओ महेश देशमुख यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.