विद्यापीठात ‘कुलगुरू हटाव’चे नारे
By Admin | Updated: March 14, 2015 00:34 IST2015-03-14T00:33:36+5:302015-03-14T00:34:21+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गुरुवारी उघडकीस आलेल्या गुणवाढ प्रकरणाचा निषेध नोंदवीत कुलगुरू मोहन खेडकर यांच्या दालनात शुक्रवारी ‘कुलगुरु हटाव’चे नारे देत ...

विद्यापीठात ‘कुलगुरू हटाव’चे नारे
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गुरुवारी उघडकीस आलेल्या गुणवाढ प्रकरणाचा निषेध नोंदवीत कुलगुरू मोहन खेडकर यांच्या दालनात शुक्रवारी ‘कुलगुरु हटाव’चे नारे देत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.
विद्यापीठाच्या मूल्यांकन विभागात पुन्हा गुणवाढ प्रकरण उघडकीस आले आहे. आंभियांत्रिकी व अन्य विद्याशाखेतील ११ विद्यार्थ्यांनी पैसे देऊन गुणवाढ करून घेतल्याचे सिध्द झाल्यानंतर शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला. बडनेऱ्यातील युवासेनाध्यक्ष राहुल माटोडे यांच्या नेतृत्वात शहर प्रमुख ललित झंझाळ, प्रवीण दिघाते, शैलेशसिंग चव्हाण, विजय खंडारे, रवी सोनटक्के, निलेशसिंग चव्हाण, अजय सूर्यवंशी, गोलू वानखडे, शक्ती भिसे, आशिष तिडके, अमोल अवघड, पवन लेंडे आदींनी कुलगुरू खेडकर यांच्या दालनात शुक्रवारी धडक दिली. गुणवाढ प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी शिवसैनिकांनी यावेळी रेटून धरली होती.
यावेळी कुलगुरूंसह परीक्षा नियंत्रक जे. डी. वडते, प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, बीसीओडीचे संचालक अजय देशमुख उपस्थित होते. शिवसैनिकांनी सर्वच अधिकाऱ्यांची कानउघाडणी करीत गुणवाढ प्रकरणाचा जाब विचारला. यापूर्वीही अमरावती विद्यापीठात गुणवाढीचे प्रकरण उघडकीस आले होते. मात्र, दोषींवर कारवाई करण्यात मात्र हयगय केली जात असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. मूल्यांकन अधिकारी मुखर्जी यांना आमच्यासमोर हजर करा, असा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला. यावेळी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके यांनी कायद्याच्या चाकोरीतूनच कामे केली जात असल्याचे शिवसैनिकांना सांगितले. या प्रकारामुळे विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली.
शिवसैनिकांनी कुलगुरूंच्या दालनात ‘जय शिवाजी जय भवानी’च्या घोषणा देत ‘कुलगुरू हटाव’ची मागणी केली. गुणवाढ प्रकरण असेच सुरु ठेवायचे असेल तर, विद्यार्थ्यांसाठी तसा विशेष कक्ष स्थापन करण्याचा उपहासात्मक सल्लाही शिवसैनिकांनी यावेळी कुलगुरूंना दिला. तब्बल अर्धा तास कुलगुरूंच्या दालनात हा गोंधळ सुरू होता. (प्रतिनिधी)
मूल्यांकनात ३५ हजारात गुणवाढ
एक महिन्यापूर्वी अमरावती विद्यापीठातील पुनर्मूंल्याकंन विभागातील गुणवाढ प्रकरण उघडकीस आले होते. ती चौकशी फे्रजरपुरा पोलीस करीत आहे. हे प्रकरण शांत होत नाही, तो दुसरे गुणवाढ प्रकरण उघडकीस आले आहे. अंभियात्रिकीच्या ११ विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेच्या नियमित मूल्यांकनानंतर उत्तर पत्रिकेंमध्ये खोडतोड करुन गुणवाढ केली. या प्रकरणात अभियांत्रिकीच्या ९ विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ३५ हजार रुपये देवून गुणवाढ केल्याची माहिती परिक्षा नियंत्रक जे. डी. वडते यांनी दिली.