दारुबंदीसाठी ‘करो या मरो’चा नारा
By Admin | Updated: May 24, 2017 00:08 IST2017-05-24T00:08:16+5:302017-05-24T00:08:16+5:30
कोर्कडा येथील दारू दुकान बंद व्हावे यासाठी महिलांनी ‘करो या मरो’ ही भूमिका घेतली आहे.

दारुबंदीसाठी ‘करो या मरो’चा नारा
महिलांचे आंदोलन : रखरखत्या उन्हात दुकानासमोर ठिय्या
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोर्कडा येथील दारू दुकान बंद व्हावे यासाठी महिलांनी ‘करो या मरो’ ही भूमिका घेतली आहे. शेडगावातील महिलांनी कोकर्डा येथील दारू दुकानासमोरच तळ ठोकून सोमवारपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. हे दुकान बंद करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
शंभर वषार्पूर्वी संतश्रेष्ठ गाडगेबाबांनी त्यांच्या जन्मभूमी परिसरातील सुमारे ६८ दारूच्या हातभट्ट्या बंद करण्यासाठी जनआंदोलन उभारले होते. त्याच शेंडगावातील महिलांनी राज्य शासनाची मान्यता असलेले देशी दारूदुकान बंद व्हावे, यासाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ४५ डीग्री तापमानात हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान एका महिलेची प्रकृति बिघडल्याने तिला उपचारार्थ रुग्णालयात पाठविन्यात आले.
महामार्गावर दारूबंदीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठी जिल्हाभरात आंदोलने सुरू आहेत. कोकर्डा येथील बाजारपेठेत असणारे दारू दुकान बंद व्हावे यासाठी चार गावातील महिलांनी एकत्रित येत आंदोलन सुरू केले आहे. कोकर्डा शहराच्या मुख्य भागात मागील ४० वर्षांपासून देशी दारूचे दुकान सुरू आहे. या दुकानामुळे अनेकांना त्रासाचा सामना करावा लागतो. मागील वर्षी झालेल्या ग्रामसभेत हे दारूचे दुकान बंद करण्यात यावे, असा ठराव घेण्यात आला होता. यावर्षीदेखील हे दुकान गावाबाहेर स्थानांतरित करण्यात यावे असा ठराव घेतला होता. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हे देखील हे दारूचे दुकान बंद व्हावे, यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, त्याचे प्रयत्न अपुरे पडल्याने अखेर महिलांनी मोर्चा सांभाळला. आंदोलन सुरू होताच दुकान मालकाने दुकानाला कुलूप लावले. मात्र, हे कुलूप कायमस्वरूप लावण्यात यावे अशी मागणी महिलांनी केली आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी व वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे.
या आंदोलनात कोकर्डा, शेडगाव, ब्राह्मणवाडा, देऊळगाव या गावातील शेकडो महिला सहभागी झाल्या आहेत. हे दारू दुकान बंद करावे यासाठी यापूर्वी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणात मध्यस्थीचा प्रयत्न तहसीलदारांनी केला होता. मात्र, महिलांनी दारू दुकान बंद होईपर्यंत आंदोलन करण्याचा पावित्रा घेतला.