धारणीतील गोवंशाचा कत्तलखाना उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:12 IST2021-03-06T04:12:41+5:302021-03-06T04:12:41+5:30
पोलिसांची गोपनीय कारवाई, सहा जनावरांसह कत्तलीचे साहित्य जप्त धारणी : शहरातील प्रभाग क्र. १३ मधील कुरेशी मोहल्ल्यात सुरू असलेला ...

धारणीतील गोवंशाचा कत्तलखाना उद्ध्वस्त
पोलिसांची गोपनीय कारवाई, सहा जनावरांसह कत्तलीचे साहित्य जप्त
धारणी : शहरातील प्रभाग क्र. १३ मधील कुरेशी मोहल्ल्यात सुरू असलेला गोवंशाचा कत्तलखाना धारणी पोलिसांनी शुक्रवारी पहाटे उद्ध्वस्त केला. ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी पाच पोलीस अधिकारी व २० कर्मचाऱ्यांनी साथीने ही मोहीम फत्ते केली. एका आरोपीला ताब्यात घेऊन कटाईचे साहित्य व गोवंश जप्त करण्यात आले.
अब्दुल रजाक शेख हुसेन कुरेशी (४५) व त्याचा मोठा भाऊ अब्दुल झहीर शेख कुरेशी (४८) हे दोघे कित्येक दिवसांपासून त्यांच्या राहत्या घरी गोवंशाचा कत्तलखाना चालवत होते. याची माहिती परिसरातील नागरिकांनी शहर पोलिसांना वारंवार दिली. मात्र, कत्तलखाना नसल्याची स्पष्टोक्ती कुरेशी बंधूंकडून दिली जायची. त्यामुळे अपेक्षित कारवाई होत नव्हती. ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी शुक्रवारी पहाटे ५ वाजता कुरेशीच्या घरावर धाड मारली. तेथे गोवंश कटाईला सुरुवात होताच पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. मात्र, झकीर हुसेन कुरेशी हा पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांनी येथून तीन गाई व तीन बैल, तराजू, कुऱ्हाड, सत्तुर, आठ धारदार सुरे असा एकूण १ लाख ३० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही कुरेशी बंधूविरुद्ध कलम ५, ५ (ब), ९, ११ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७७ सुधारणा २०१५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी रजाक शेख हुसेन कुरेशी याला पोलिसांनी अटक केली.
बॉक्स
कमालीची गुप्तता
ठाणेदार विलास कुलकर्णी यांना कत्तलखान्याबाबत गुरुवारी माहिती पडले. होळी सणाच्या अनुषंगाने एका गावातील दारूअड्डा उदध्वस्त करायचा असल्याचे रात्री सांगून ठाणेदारांनी अधिनस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहाटे हजर राहण्याचे सांगितले. शुक्रवारी पहाटे ते पोलीस बसने थेट कुरेशी मोहल्ल्यात पोहोचले आणि अवैध कत्तलखान्यावर धाड टाकण्यात आली.