पोलीस सूत्रांनुसार, सतीश गिरीधरराव आंबेकर (१८), अक्षय राजू वानखडे (२४) आणि शंकर शालिकराम चव्हाण (३५ , तिन्ही रा. कारंजा लाड) अशी जखमी मजुरांची नावे आहेत. माजी नगरसेवक अरुण जयस्वाल यांच्या घराच्या बाजूलाच त्यांचे बंधू प्रमोद जयस्वाल यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम संजय प्रल्हाद चव्हाण (रा. कारंजा लाड) नामक ठेकेदार करीत आहे. त्यांनी स्लॅब टाकण्याचे कंत्राट बशीर नामक व्यक्तीला दिले. सोमवारी सकाळी स्लॅब टाकण्यासाठी सतीश आंबेकर, अक्षय वानखडे, शंकर चव्हाण यांच्यासह अन्य कामगार दुसऱ्या माळ्यावरील मचान उभी करीत असताना तेथील सज्जा त्यावर कोसळला आणि मजूर जमिनीवर आदळले. तेथे उपस्थित अन्य मजुरांनी जखमींना तात्काळ इर्विन रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व रुग्णालयातही दाखल झाले होते.
स्लॅब टाकणारे मजूर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:30 IST