शहरात उडविले गेले 'आकाश कंदील'
By Admin | Updated: November 1, 2016 00:22 IST2016-11-01T00:19:23+5:302016-11-01T00:22:51+5:30
दिवा प्रज्ज्वलित करून आकाशात कंदील उडविल्यास तो फौजदारी गुन्हा ठरू शकतो, ..

शहरात उडविले गेले 'आकाश कंदील'
डीसीपींच्या आदेशाचे उल्लंघन : फौजदारी कारवाई केव्हा ?
अमरावती : दिवा प्रज्ज्वलित करून आकाशात कंदील उडविल्यास तो फौजदारी गुन्हा ठरू शकतो, असे आदेश पोलीस उपायुक्तांनी शनिवारी काढले. तरीसुद्धा आदेशाचे उल्लंघन करीत फटाका विक्रेत्यांजवळून आकाश कंदील विकत घेऊन नागरिकांनी सर्रास ते हवेत उडविले.
ही बाब धोकादायक ठरणारीच होती. मात्र, सुदैवाने काही अप्रीय घटना घडली नाही. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर व आकाश कंदील उडविणाऱ्यावर फौजदारी केव्हा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या आदेशाचे पालन काटेकोरपणे व्हावे सहायक पोलीस आयुक्त पी.डी.डोंगरदिवे यांनी संबंधित ठाणेदारांना पत्राद्वारे कळविले. तरीदेखील आकाश कंदील विक्री व उडविल्याचे आढळून आले.
दिवाळी सणानिमित्त शहरातील बाजारपेठेत विविध प्रकारच्या फटाक्यांची विक्री करण्यात आली. या फटाक्यामध्ये आकाशात उडविणाऱ्या कंदीलावर यंदा बंदी घालण्यात आली होती. दिवा प्रज्ज्वलित करून आकाशात कंदील सोडल्यास तो हवेच्या दिशेने उडत राहतो. मात्र, दिव्यातून निघणारा गॅस संपताच तो आकाश कंदील कुठेही जाऊन पडण्याची शक्यता असते. हे कंदील रहिवासी ठिकाणी, कारखाने, वने व इतर ठिकाणी पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा उडत्या कंदिलाच्या विक्रीवर यंदा पोलीस विभागाकडून बंदी घालण्यात आली होती.
यासंदर्भात पोलीस विभागाकडून आदेश जारी करण्यात आले होते. त्यामुळे आकाश कंदील बाजारपेठेत विक्री केले जात असेल, किंवा असे कंदिल आकाशात उडविला जात असेल, तर अशा नागरिकांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशा आदेशाचे पत्र डीसीपींनी काढले होते. नागरिकांनी जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचे आवाहनसुद्धा करण्यात आले. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करताना अनेक जण आढळून आले असून बाजारपेठेतसुध्दा अशा घातक ठरणाऱ्या आकाश कंदिलाची सर्रासपणे विक्री करण्यात आली आहे. याकडे पोलीस विभागाने गांभीर्याने लक्ष पुरविले नसून कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.
आकाश कंदील विक्री व उडविणाऱ्यांची माहिती हाती लागल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यासंदर्भात एसीपींना सूचना देण्यात आल्या आहेत.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त