मनात चुकचुकली शंकेची पाल

By Admin | Updated: August 7, 2015 00:21 IST2015-08-07T00:21:46+5:302015-08-07T00:21:46+5:30

जहांगीरपूर मार्गे जात असल्याचे घरी सांगितले. दोन ते अडीच तासांचेच अंतर असतानाही हे कुटुंब दुपारी २ वाजेपर्यंत लग्नस्थळी पोहोचलेच नाही.

Skepticism | मनात चुकचुकली शंकेची पाल

मनात चुकचुकली शंकेची पाल

अमरावती : जहांगीरपूर मार्गे जात असल्याचे घरी सांगितले. दोन ते अडीच तासांचेच अंतर असतानाही हे कुटुंब दुपारी २ वाजेपर्यंत लग्नस्थळी पोहोचलेच नाही. लग्नात सहभागी नातेवाईकांनी यवतमाळात आजनकर यांच्या घरी फोन केला. तेव्हा ते सकाळी ७ वाजताच निघाल्याचे सांगितले गेले. इकडे लहान भावाच्या मनातही शंकेची पाल चुकचुकली. त्याने तीनही मोबाईलवर संपर्क केला. मात्र मोबाईल बंद येत होते. शेवटी दुचाकी काढून तो शोधात निघाला. जहागीरपूर मार्गे जाताना थांगपत्ता लागला नाही. लग्नातील पाहुणे मंडळीही वाहने घेऊन शोधात सहभागी झाले. बुधवारी रात्री ११ वाजेपर्यंत संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र उपयोग झाला नाही. गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास एक कार दुर्गवाडा (ता. तिवसा) येथील नाल्यात वाहून आल्याची माहिती मिळाली आणि शोधणाऱ्यांच्या हृदयात चर्र झाले. सर्वांनी दुर्गवाड्याकडे धाव घेतली. पाहतात तो काय, एका कारमध्ये चौघेही निपचित पडल्याचे दिसले. घात झाल्याचे त्याचक्षणी लक्षात आले आणि सर्वांनी एकच हंबरडा फोडला.
संजय आजनकर हे यवतमाळच्या पशु चिकित्सालयात पशुधन पर्यवेक्षक पदावर कार्यरत होते. गजानन आजनकर हे एका खासगी शो-रुममध्ये व्यवस्थापक होते. सेवानिवृत्त तलाठी गोविंद आजनकर यांची तीनही मुले एकत्र राहत होती. काही दिवसांपूर्वीच संजयने रेणुकानगरात घराचे बांधकाम केले होते. मात्र या तिघाही भावांचा लळा कायम होता. प्रत्येक सुख-दु:खात ते सहभागी व्हायचे. संजय हे थोरले बंधू आई-वडिलांसोबत राहत होते. दोन लहान भाऊ प्रगतीनगरातील वडिलोपार्जित घरात राहत होते. या घटनेने संजय यांचा अपंग मुलगा श्रीपाद (१०), त्यांची मोठी मुलगी साक्षी (१५) आणि गजाननची मोठी मुलगी पौर्णिमा (८) या चिमुकल्यांचे मातृ-पित्रृ छत्र हरविले. गुरुवारी सकाळी दोन मुले, सून आणि नातीचा मृत्यू झाल्याचे कळताच वृद्ध गोविंदराव आणि सुमन या दाम्पत्याच्या दु:खाला पारावार उरला नाही.
परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. सोशल मीडियावरून ही घटना यवतमाळात वाऱ्यासारखी पसरली. प्रत्येक जण या घटनेने हळहळत होता. (प्रतिनिधी)

Web Title: Skepticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.