‘गुगल मॅप’ने दिला प्रारूप रचनेला आकार
By Admin | Updated: September 11, 2016 00:15 IST2016-09-11T00:15:08+5:302016-09-11T00:15:08+5:30
चार सदस्यीय पद्धतीने होणाऱ्या निवडणुकांसाठी २२ प्रभागांचा प्रारुप आराखडा महापालिका प्रशासनाने तयार केला आहे.

‘गुगल मॅप’ने दिला प्रारूप रचनेला आकार
राजकारण्यांमध्ये उत्सुकता : १२ ला राज्य निवडणूक आयोगाकडे
अमरावती : चार सदस्यीय पद्धतीने होणाऱ्या निवडणुकांसाठी २२ प्रभागांचा प्रारुप आराखडा महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. आयुक्त हेमंत पवार यांच्या स्वाक्षरीने हा आराखडा विभागीय आयुक्तांकडे सोपविण्यात आला. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी आरक्षण तपासणी करून प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव १२ सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार आहेत.
फेबु्रवारी २०१७ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग प्रारुप आराखड्याबाबत कमालीची उत्सुकता आहे. यासाठी प्रशासनाची जोरदार तयारी सुरूअसून खर्चासाठी कोट्यवधींची रक्कमही मागे पाडण्यास सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने एससी, एनटी आरक्षणासह प्रभाग रचनेचे प्रारुप तयार केले आहे. या आराखड्याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. त्यामुळे नगरसेवक व इच्छूकांनी महापालिकेत आपआपल्या सोर्सच्या माध्यमातून प्रभाग रचना जाणून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र प्रशासनाने याबाबत कमालीची गुप्तता बळगली आहे. 'गुगल मॅप'च्या आधारे हा आराखडा तयार करण्यात आता, तर राज्य निवडणूक आयोगाच्या द्विसदस्यीय समितीने अमरावती गाठून प्रारुप प्रभाग रचनेचा आढावा घेतला आहे.
महापालिका निवडणुकीची संभाव्य प्रभागरचना महापालिकेने त्रिसदस्यी य समितीकडे सादर केल्यानंतर राजकीय पक्षांची हालचाली सुरु झाल्या आहेत. नव्या प्रभाग पद्धतीत मतदार संख्या मोठी असल्याने प्रत्येकाचा प्रभाग रचनेकडे डोळे लागले आहे.कुठला प्रभाग कुठून तुटला, कुठे जोडल्या गेला. याबाबतची उत्सुकता प्रभाग रचनेच्या प्रारुप आराखड्याने वाढवली आहे. ७ आॅक्टोंबरला नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिलांकरीता सोडत काढण्यात येईल.तत्पूर्वी ४ आॅक्टोंबरला त्याबाबत जाहीर नोटिस प्रसिद्ध होईल.१० आॅक्टेंबरला प्रारुप प्रभाग रचनेची (सोडतीनंतर) अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध होईल.
आरक्षण सोडतीकडे लक्ष
१२ सप्टेंबरला विभागीय आयुक्त प्रारुप प्रभाग रचना व राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार आहेत. निवडणूक आयोग त्याची तपासणी करुन २३ सप्टेंबर रोजी प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देईल. त्यामुळे ७ आॅक्टोबर रोजी कुणाचा प्रभाग कुठल्या प्रभागात जोडण्यात आला हे स्पष्ट होईल. तसेच दिवाळीनंतर अंतिम प्रभाग रचना स्पष्ट होणार आहे. आरक्षण सोडती जाहीर झाल्यानंतर उमेदवारांच्या हालचाली वाढणार आहे.