मेळघाटातील ‘ती’ सहा गावे प्रकाशापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 05:00 IST2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:00:51+5:30
तालुक्यातील रंगूबेली, खामदा, ढोकळा, कुंड, किनीखेडा आणि खोपमार या गावांत स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतर अंधाराचे साम्राज्य कायम आहे. प्रजासकाकाची ७० वर्षे पूर्ण करणाºया या देशातील धारणी तालुक्यात रात्रीचा काळोख हीच आदिवासींची ओळख ठरली आहे. मेळघाट म्हटले की, डोळ्यांसमोर येतो तो १९९३ मधील कुपोषणाचा उद्रेक. कुपोषणाचे तांडव प्रसिद्धी माध्यमातून उघड झाल्यानंतर शासनाने मेळघाटाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.

मेळघाटातील ‘ती’ सहा गावे प्रकाशापासून वंचित
श्यामकांत पाण्डेय।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : सातपुड्याच्या कुशीत आणि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या मेळघाटातील आदिवासी जनता अद्यापही विकासाच्या प्रवाहापासून कोसोदूर आहे. मेळघाटातील अनेक गावांमध्ये अद्यापही वीज, रस्ते, पाणी या पायाभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. धारणी तालुक्यातील सहा गावे त्याची ज्वलंत उदाहरण ठरली आहेत.
तालुक्यातील रंगूबेली, खामदा, ढोकळा, कुंड, किनीखेडा आणि खोपमार या गावांत स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतर अंधाराचे साम्राज्य कायम आहे. प्रजासकाकाची ७० वर्षे पूर्ण करणाºया या देशातील धारणी तालुक्यात रात्रीचा काळोख हीच आदिवासींची ओळख ठरली आहे.
मेळघाट म्हटले की, डोळ्यांसमोर येतो तो १९९३ मधील कुपोषणाचा उद्रेक. कुपोषणाचे तांडव प्रसिद्धी माध्यमातून उघड झाल्यानंतर शासनाने मेळघाटाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. मेळघाटातील अठराविश्वे दारिद्र्य भोगणाºया आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कुपोषणाचा नावाखाली दरवर्षी विविध विभागांमार्फत कोट्यवधीचा निधी येतो. मध्य प्रदेशातून वीजपुरवठा घेण्याच्या वल्गना केल्या जातात. मात्र, योजनांची अंमलबजावणी नीटशी होत नसल्याने व शासकीय योजनांच्या पाचवीला भ्रष्टाचार पुजला असल्याने आदिवासी खोल गर्तेत अडकला आहे.
दैनंदिन गरजेच्या प्रकारात मोडणाºया वीजपुरवठ्याची स्थितीदेखील तशीच आहे. रंगुबेली, खामदा, ढोकळा, कुंड, खोपमार या सहा गावांमध्ये विजेचे खांब पोहोचले नाहीत. त्यामुळे गावात ना मोबाईल, ना वीजेवर चालणारी कुठली उपकरणे. स्वातंत्र्यापूर्वीची खेडीे कशी असावीत, हे या सहा गावांमध्ये भटकंती केल्यास कळू शकेल. गावात पोहोचण्यासाठी रस्तासुद्धा नाही. या सहा गावांमध्ये पोहोचणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. दुचाकीचा प्रवास मोठ्या मुश्किलीने केला जाऊ शकतो, अशी या गावांची अवस्था आहे. याव्यतिरिक्त गावात पिण्यासाठी स्वच्छ पाणी हे पाणीपुरवठा योजनेअभावी मिळेनासे झाले आहे. त्यामुळे ही गावे मेळघाटातील आहेत का आणि मेळघाट हे अमरावती जिल्ह्यात येते का, असा सवाल विचारला जात आहे. आपल्या खेड्याची परिस्थिती सुधारेल, या आशेवर या सहा गावांतील अनेक पिढ्या जगत राहिल्या. त्यामुळे हे एक स्वप्नच राहील का, असा प्रश्न येथील आदिवासींना सतावत आहे.
धारणी तालुक्यातील या सहा गावांव्यतिरिक्त धारणी महावितरण उपविभाग अंतर्गत येणारे चिखलदरा तालुक्यातील रक्षा हे गावसुद्धा विजेविना आहे. महावितरणने आदेश दिल्यास, योजनांना मान्यता मिळाल्यास या गावांना वीजपुरवठा करणे शक्य आहे.
-विनय तायडे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण