दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये अमरावतीचे सहा धावपटू धावणार
By जितेंद्र दखने | Updated: May 24, 2024 21:42 IST2024-05-24T21:42:02+5:302024-05-24T21:42:12+5:30
डर्बन शहरात ९ जून रोजी स्पर्धा, अमरावतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला

दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये अमरावतीचे सहा धावपटू धावणार
अमरावती: जगातील सर्वांत खडतर मॅरोथॉन पैकी एक असलेली ९० कि.मी. ची कॉम्रेड मॅरोथॉन स्पर्धा येत्या ९ जून २०२४ रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन, पिटरमटिर्झबर्ग येथे होणार आहे. या स्पर्धेत १३२ देशांमधून धावपटू सहभाग नाेंदवित असून, अमरावती येथील सहा धावपटू सहभागी होणार आहेत. यात जिल्ह्यातील एकमेव ४३ वर्षीय महिला सलग दुसऱ्यांदा सहभागी होणार आहे.
कॉम्रेड ९० कि.मी. मॅरोथॉनला अल्टिमेट ह्युमन रेस म्हणून ओळखल्या जाते. यावर्षी ९७ वी मॅरेथॉन दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहरापासून सकाळी ५.३० वाजता सुरू होणार असून, ती पिटरमटिर्झबर्ग या शहरामध्ये संध्याकाळी ५.३० वाजता समारोप होणार आहे. या स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातील सेवा निवृत्त विक्रीकर उपायुक्त दिलीप पाटील, पोलिस निरीक्षक अनिल कुरळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मंगेश पाटील, पोलिस कर्मचारी राजेश कोचे, पोलिस निरीक्षक सतीश उमरे व म्हाडाच्या उपअभियंता दीपमाला साळुंखे (बद्रे) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दिलीप पाटील यांनी कॉम्रेड मॅरेथॉन ही सलग आठवेळा यशस्वीरीत्या पूर्ण केली असून, यावर्षी ते नवव्यांदा सहभाग घेत आहेत, तर दीपमाला साळुंखे यांनी सन २०२३ मध्ये ही स्पर्धा ११ तास ५० मिनिटांमध्ये पूर्ण केली होती. हे सहा धावपटू अमरावती येथून येत्या दि. ४ जून रोजी अमरावती दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होणार आहे.
पाच महिन्यांपासून सराव
अमरावती येथील पाच स्पर्धकांची तयारी दिलीप पाटील यांनी जानेवारी २०२४ पासून सुरू केली होती. पाच महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून हे स्पर्धक कॉम्रेड मॅरेथॉनसाठी रवाना होत आहे. या प्रशिक्षणादरम्यान सर्व स्पर्धकांनी २ वेळा ६० कि.मी.चे लाँग रन, तर ४२ ते ५० कि.मी वर तसेच दर रविवारी किमान ३६ किमीचे लाँग रन पूर्ण केले आहे.