पीएसआयसह सहा पोलीस निलंबित

By Admin | Updated: July 2, 2014 23:08 IST2014-07-02T23:08:02+5:302014-07-02T23:08:02+5:30

कर्तव्यात हयगय करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलीस उपायुक्त बी. के. गावराणे यांनी सोमवारी हे आदेश जारी केल्याने पोलीस वर्तुळात

Six policemen suspended with PSI | पीएसआयसह सहा पोलीस निलंबित

पीएसआयसह सहा पोलीस निलंबित

कर्तव्यात हयगय : पोलीस वर्तुळात खळबळ
अमरावती : कर्तव्यात हयगय करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलीस उपायुक्त बी. के. गावराणे यांनी सोमवारी हे आदेश जारी केल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. निलंबित केलेल्यांमध्ये उपनिरीक्षक मनीष मानकर, जमादार पंकज कुकडे, खुशाल तायवाडे, धनराज ठाकूर, मंगेश माहुरे, संजय अडसड व विलास महादेव पोहळेकर यांचा समावेश आहे. नाकाबंदी दरम्यान परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त ‘लोकमत’च्या वृत्ताने केबीनबाहेर पडले व हे कर्मचारी कर्तव्य बजावण्याऐवजी झाडाखाली बसून आढळून आले होते, हे विशेष.
‘मेकला साहेब, एक करा, वेशांतर करुन बाहेर पडा’ या मथळ्याखाली २० जून रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांनी शहरात गस्त घातली होती, हे विशेष. रविवारी २२ जून रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजतापर्यंत विविध ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. प्रत्येक ठिकाणी उपनिरीक्षक, वाहतूक पोलीस व तीन जमादारांचा पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता. हे पथक मार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करुन गरज भासल्यास कारवाई करीत होते.
साईनगरातील बेनाम चौकात नाकाबंदीसाठी राजापेठचे पोलीस उपनिरीक्षक मनीष मानकर, वाहतूक पोलीस संजय अडसड, जमादार धनराज ठाकूर, खुशाल तायडे , पंकज कुकडे, मंगेश माहुरे यांना कर्तव्यावर नियुक्त केले होते. दरम्यान दुपारी १ वाजता पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला हे खासगी वाहनाने शहराचा फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेत. बडनेरा मार्गाने जात असताना नाकाबंदीसाठी तैनात पोलीस उपनिरीक्षक मंगेश मानकर हे कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांसह वाहनांची तपासणी करण्याऐवजी एका झाडाखाली आराम करताना आढळून आले. मेकला यांनी हा ‘नजारा’ पाहिला आणि बडनेऱ्याकडे निघून गेले. काही वेळांनंतर परतीच्या प्रवासातही याच ठिकाणी हे कर्मचारी झाडाखाली आराम करताना आढळून आले. कर्तव्यात हयगय करणारे पोलीस उपनिरीक्षक व कर्मचाऱ्यांना पाहून त्यांनी या साऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी पोलीस उपायुक्त बी. के. गावराणे यांनी पीएसआयसह सहा कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढलेत. (प्रतिनिधी)

Web Title: Six policemen suspended with PSI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.