आत्महत्येचा इशारा देणारे सहा जण ताब्यात
By Admin | Updated: September 15, 2015 00:16 IST2015-09-15T00:16:05+5:302015-09-15T00:16:05+5:30
अचलपूर येथील बहुचर्चित अमित बटाऊवाले हत्या प्रकरणासंदर्भात आत्महत्येचा इशारा देणाऱ्या युवा स्वाभिमानच्या सहा कार्यकर्त्यांना ...

आत्महत्येचा इशारा देणारे सहा जण ताब्यात
अल्टिमेटमची मुदत संपली : नोटीस बजावून सोडले
अमरावती : अचलपूर येथील बहुचर्चित अमित बटाऊवाले हत्या प्रकरणासंदर्भात आत्महत्येचा इशारा देणाऱ्या युवा स्वाभिमानच्या सहा कार्यकर्त्यांना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना नोटीस बजावून सायंकाळी सोडण्यात आले आहे.
अचलपूर येथील अमित बटाऊवाले हत्याप्रकरणी उच्चपदस्थ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी युवा स्वाभिमानचे मेळघाट संपर्कप्रमुख उपेन बछले यांनी सात दिवसांचा अल्टिमेटम विभागीय आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला होता. प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप बछले यांनी केला होता.
ज्या पध्दतीने लाठ्या-काठ्या व लोंखडी सळाखीने अमित बटाऊवालेची हत्या करण्यात आली. त्याप्रकारे आमचीदेखील हत्या करावी, यासाठी शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती. सात दिवसांत दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास तीच प्रशासकीय परवानगी समजून विभागीय आयुक्त कार्यालयात लाठी-काठी व सळाखीने आत्महत्या करण्याचा इशारा बछले व कार्यकर्त्यांनी दिला होता. ही मुदत संपल्यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात युवा स्वाभिमानच्या आंदोलनासाठी बछले व कार्यकर्ते उपस्थित असताना गाडगेनगर पोलिसांनी उपेन बछले, विनायक चव्हाण, गणेश शनवारे, अक्षय अग्रवाल, रविंद्र गायन, मोहन गायन, गणपत भाकरे यांना ताब्यात घेतले. त्यांना सायंकाळी नोटीस बजावून सोडण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
अचलपूर येथील अमित बटाऊवाले हत्या प्रकरणासंदर्भात कार्यकर्त्यांनी आत्महत्येचा इशारा दिला होता. याप्रकरणी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले.
- के.एम. पुंडकर,
पोलीस निरीक्षक,
गाडगेनगर पोलीस ठाणे.