सहा महिन्यांनंतर त्याने साधला डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST2020-04-20T05:00:00+5:302020-04-20T05:00:55+5:30
रविवारी तिने आपल्या चुलत बहिणीकडून घरातील बकऱ्या बांधून घेतल्या व ती घरात गेली. घरात जायला अर्धातास होत नाही, तेव्हाच तिच्या ओरडण्याचा आवाज आपल्या कानी पडला. तिच्या घरातील मागील खोलीच्या दरवाज्यातच ती व आरोपी प्रवीण रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते. तो प्रसंग पोलिसांसमोर कथन करताना मृताच्या चुलत बहिणीला रडू कोसळले.

सहा महिन्यांनंतर त्याने साधला डाव
किरण होले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : मागील वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये त्यांच्यात अबोला निर्माण झाला. घरच्यांनी समजूत काढल्याने तीही त्याचेपासून दूर राहू लागली. मात्र, एक वर्षांपासूनचे प्रेमसंबंध त्याला स्वस्थ बसू देईनात. त्यातून त्याचा संताप होत गेला. अन् त्याने आत्मघातकी पाऊल उचलले. सहा महिन्यांच्या अस्वस्थेनंतर त्याने तिच्यासह स्वत:लाही संपविण्याचा कट रचला. रविवारी तिच्या घरी कुणीही नसल्याची संधी साधत त्याने तिला संपविले. स्वत:वर वार केले. मात्र, आत्महत्येचा त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. या घटनेने अनेकांच्या काळजाचे ठोके चुकले. तालुक्यातील लेहगाव रेल्वे येथे रविवारी घडलेल्या घटनेने धामणगाव रेल्वेच्या घटनेची पुनरावृत्ती झाली.
मृत १७ वर्षीय मुलीचे आई-वडील रविवारी अकोट तालुक्यातील केळीवेळी येथे दुचाकीने गेले होते. नातेवाईकाचा अंत्यविधी होण्यापूर्वीच त्यांना मुलीच्या हत्येची माहिती मिळाली. मात्र, तोपर्यंत मुलीचा मृतदेह दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला होता. त्यांनी रुग्णालय गाठल्यानंतर त्या दाम्पत्याला आपल्या मुलीचे कलेवरच पाहावयास मिळाले. दर्यापुरात शवविच्छेदन आटोपल्यानंतर सायंकाळी ७ च्या सुमारास तिचे पार्थिव लेहगाव येथे आणण्यात आले. तोपर्यंत मृत मुलीच्या कुडामातीच्या घरासमोर ग्रामस्थांची मोठी गर्दी उसळली. त्यामुळे दंगा नियंत्रण पथक व एसआरपीएफच्या चमूला पाचारण करण्यात आले. मुलीचे कलेवर पाहून माता-पिता व लहान भावाने मन आक्रंदून सोेडणारा आक्रोश केला. संचारबंदी व जमावबंदीची अंमलबजावणी करत पोलिसांच्या उपस्थितीत सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास मृत मुलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आरोपीकडून ब्लॅकमेलिंग
तक्रारीनुसार, दोघांचे एक वर्षापासून प्रेमसंबंध जुळले होते. काही दिवसांनंतर आरोपी सदर मुलीला ब्लॅकमेल करू लागला होता. तिची छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत होता. त्यामुळे तिने घडलेला सर्व प्रकार आईवडिलांच्या कानी घातला. त्यातून मुलीच्या आईवडिलांनी आरोपी प्रवीणला समजावून सांगितले. तेव्हापासून तिने आरोपीशी बोलणे बंद केले. रविवारी तिने आपल्या चुलत बहिणीकडून घरातील बकऱ्या बांधून घेतल्या व ती घरात गेली. घरात जायला अर्धातास होत नाही, तेव्हाच तिच्या ओरडण्याचा आवाज आपल्या कानी पडला. तिच्या घरातील मागील खोलीच्या दरवाज्यातच ती व आरोपी प्रवीण रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते. तो प्रसंग पोलिसांसमोर कथन करताना मृताच्या चुलत बहिणीला रडू कोसळले. या घटनेने लेहगाववासीयांना धामणगाव रेल्वे येथे सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या हत्याप्रकरणाची आठवण झाली.