सहा महिन्यात ४६१ शेतकऱ्यांनी कवटाळला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:09 IST2021-07-19T04:09:54+5:302021-07-19T04:09:54+5:30
अमरावती : अस्मानी व सुल्तानी संकटामुळे पश्चिम विदर्भात यंदा जूनअखेर ४६१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. दर दोन दिवसांत पाच तर ...

सहा महिन्यात ४६१ शेतकऱ्यांनी कवटाळला मृत्यू
अमरावती : अस्मानी व सुल्तानी संकटामुळे पश्चिम विदर्भात यंदा जूनअखेर ४६१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. दर दोन दिवसांत पाच तर दर नऊ तासांत एक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे वास्तव आहे.
कर्ज, नापिकी, नैसर्गीक आपत्ती, दुष्काळ यामध्ये वऱ्हाडातील शेतकरी अडकला आहे. यामध्ये मुला-मुलींचे शिक्षण, लग्न व घरसंसार कसा करावा, या विवंचनेत शेतकऱ्यांच्या संघर्षात नैराश्य मात करीत आहेत. नापिकीच्या दृष्टचक्रात खासगी सावकारांचे कर्ज वाढत आहे. शेतीमध्ये उत्पादन खर्चही पदरी पडत नसल्याने पोशिंद्याचा धीर खचून तो मृत्यूचा घोट घेत असल्याचे चित्र दुदैवी आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार, यंदा पाचही जिल्ह्यात ४६१ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये जानेवारी महिन्यात ७८, फेब्रुवारीत ७२, मार्चमध्ये ८९, एप्रिल ६४, मे ७५ व जून महिन्यात ८३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. आतापर्यंत यापैकी फक्त ९६ प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. १२३ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. २४२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यासंदर्भात जिल्हा समितीची सहा-सहा महिने बैठक होत नसल्याने प्रशासनाची याविषयी अनास्था दिसून येत आहे.
बॉक्स
सन २००१ पासून १६,८४८ शेतकरी आत्महत्या
विभागामध्ये १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद महसूल विभागाद्वारे घेण्यात येते. त्यानुसार आतापर्यंत १६ हजार ८४८ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये ७,५६५ प्रकरणात वारसांना शासन मदत देण्यात आलेली आहे. ८,९७३ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आलेली आहे. याशिवाय ३९० प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत.
बॉक्स
शेतकरी आत्महत्यांची जिल्हानिहाय यंदाची स्थिती
१) अमरावती जिल्ह्यात १०८ प्रकरणे, २७ पात्र, ७ अपात्र ७४ प्रलंबित
२)अकोला जिल्ह्यात ६० प्रकरणे, १४ पात्र, २ अपात्र, ४४ प्रलंबित
३) यवतमाळ जिल्ह्यात १३४ प्रकरणे, ४६ पात्र, ५६ अपात्र, ३२ प्रलंबित
४) बुलडाणा जिल्ह्यात १३२ प्रकरणे, ८ पात्र, ४३ अपात्र, ८१ प्रलंबित
५) वाशिम जिल्ह्यात २७ प्रकरणे, १ पात्र, १५ अपात्र, ११प्रलंबित