‘चाणक्य’ला सहा लाखांचा दंड
By Admin | Updated: July 24, 2015 00:19 IST2015-07-24T00:19:45+5:302015-07-24T00:19:45+5:30
नागपूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या रहाटगाव येथील ‘हॉटेल चाणक्य’ला विनापरवानगी बांधकाम केल्याप्रकरणी सहा लाख रुपयांचा दंड आकारण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

‘चाणक्य’ला सहा लाखांचा दंड
नोटीस बजावली : विनापरवानगी बांधकाम, अतिक्रमण असल्याचा अहवाल
‘आदित्य’चे मोजमाप आटोपले
‘गौरी ईन’ या प्रशस्त हॉटेलच्या बांधकामासोबतच हॉटेल आदित्यच्या बांधकामाची तपासणी करण्यात आली आहे. ‘आदित्य’चे मोजमाप आटोपले असून तपासणी अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाईल, अशी माहिती सहायक संचालक नगररचना सुरेंद्र कांबळे यांनी दिली.
अमरावती : नागपूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या रहाटगाव येथील ‘हॉटेल चाणक्य’ला विनापरवानगी बांधकाम केल्याप्रकरणी सहा लाख रुपयांचा दंड आकारण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्याबाबत सहायक आयुक्तांना कळविले आहे.
काही दिवसांपूर्वी महापालिका सहायक संचालक नगररचना विभागाने ‘हॉटेल चाणक्य’च्या बांधकामाची तपासणी केली असता नियमबाह्य पध्दतीने टिनाचे शेड उभारण्यात आल्याचे चमुच्या लक्षात आले होते. ‘चाणक्य’च्या बांधकामाचा तपासणी अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आला. हॉटेल चाणक्यच्या संचालकांनी अतिक्रमण करुन टिनाचे शेड उभारल्याचे तपासणी अहवालात नमूद होते. हे प्रकरण आयुक्तांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे पाठविले होते. या पथकाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी नोडल अधिकारी चव्हाण यांना ‘चाणक्य’च्या अतिक्रमित जागेबाबत अहवाल पाठविण्याचे कळविले आहे.
पहिल्या टप्प्यात ६ लाख रुपये कराची दंडात्मक कारवाई असून सहायक संचालक नगररचना विभागाने अहवाल सादर केल्यानंतर पुन्हा दंडात्मक रक्कम वसूल केली जाईल. नोडल अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्याबाबत कळविल्यास तशी कारवाई केली जाईल, अशी माहिती आहे. (प्रतिनिधी)