कांडलीत कोरोनामुळे सहा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:14 IST2021-03-10T04:14:19+5:302021-03-10T04:14:19+5:30
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील कांडली ग्रामपंचायत क्षेत्रात महिन्याभरात कोरोनामुळे सहाच्यावर मृत्यू झाले आहेत. हा मृत्यूचा आकडा दहाचेवर असल्याचे तेथील ...

कांडलीत कोरोनामुळे सहा मृत्यू
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील कांडली ग्रामपंचायत क्षेत्रात महिन्याभरात कोरोनामुळे सहाच्यावर मृत्यू झाले आहेत. हा मृत्यूचा आकडा दहाचेवर असल्याचे तेथील रहिवाशों म्हणणे आहे. तर कोरोना रुग्णांची संख्या देखील दररोज वाढत आहे. महिन्याभरात तेथील कोरोना संक्रमितांची संख्या शंभरच्या वर गेली आहे. कांडलीतील परिस्थिती स्फोटक असून, तेथील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. खाजगी रुग्णालयातील कोरोना रुग्ण व कोरोना संक्रमितांच्या मृत्यूची माहिती अचलपूर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडे नाही.
कांडलीतील लोकसंख्या २५ हजारांच्या आसपास आहे. एका प्राथमिक आरोग्य केंद्राची लोकसंख्या असूनही केवळ तीन हजार लोकसंख्येला साजेसे असे उपकेंद्रे कांडलीत आहे. या उपकेंद्रावरही कर्मचारी पुरेसे नाहीत. कांडलीतील आरोग्य यंत्रणाच अपुरी पडत असल्यामुळे तेथील रहिवाशांचे आरोग्यच डावावर लागले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचे आकडे बघता संपूर्ण कांडली क्षेत्रात कुठेही परिणामकारक निर्जंतुकीकरण केले गेलेले नाही. क्षेत्राची स्वच्छता, तुडुंब भरलेल्या नाल्या, सांडपाण्याचे गटारे व निर्जंतुकीकरणाकडे संबंधित यंत्रणेचे कमालीचे दुर्लक्ष आहे.
कांडली क्षेत्रात कोरोना नियमावलीकडे प्रशासनासह नागरिकांचे ही दुर्लक्ष होत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. कोरोना संक्रमितांची संख्या शंभरच्या वर गेल्यानंतर घडत असलेले मृत्यू बघता, कांडलीत ६ मार्चला कोविड चाचणीचा कॅम्प घेण्यात आला. यात २२४ लोकांनी कोविड चाचणी केली. यातील ४६ रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये १० लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर १७८ लोकांचे स्वॅब आरटीपीसीआरकरिता पाठविण्यात आले आहेत.
बॉक्स
धर, उचल न् टाक कोविड सेंटरला
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला की, धर, उचल अन टाक कोविड सेंटरला. एवढीच कार्यवाही अचलपूर पंचायत समितीचा आरोग्य विभाग करीत आहे. यात कोविड नियमावलीतील होम आयसोलेशनकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत आहे. वयोवृद्धांना कोविड सेंटरला नेऊन टाकले जात आहे. येथील आरोग्य विभाग त्या रुग्णांची काळजी घेण्यात अपयशी ठरला आहे. लक्षणे नसलेल्यांच्या पॉझिटिव्ह रुग्णांची यात हेळसांड होत आहे. यातील काहीचे आरटीपीसीआर निगेटिव्ह आल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करीत त्या रुग्णांना कोविड सेंटरला ठेवले जात आहे. दरम्यान, रपिड अॅन्टिजेन टेस्ट महत्त्वाची की आरपीटीपीआर, याबाबत नागरिकांना संभ्रम निर्माण होत आहे.