शिक्षक परिषदेकडून बीडीओंच्या दालनासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST2021-03-18T04:13:15+5:302021-03-18T04:13:15+5:30
फोटो - धारणी १७ एस दोन महिन्यांपासून वेतन रखडले, शिक्षक संघटना संतप्त धारणी : अतिदुर्गम भागात विद्यादान करणाऱ्या शिक्षकांचे ...

शिक्षक परिषदेकडून बीडीओंच्या दालनासमोर ठिय्या
फोटो - धारणी १७ एस
दोन महिन्यांपासून वेतन रखडले, शिक्षक संघटना संतप्त
धारणी : अतिदुर्गम भागात विद्यादान करणाऱ्या शिक्षकांचे वेतन दोन महिन्यांपासून अदा करण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त शिक्षकांकडून शिक्षक परिषदेच्या नेतृत्वात १६ मार्च रोजी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मार्चचा दुसरा पंधरवडा सुरू झाला तरी धारणी पंचायत समितीकडून जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचे वेतन शिक्षकांना अदा करण्यात आले नाहीत . त्यामुळे शिक्षकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. दरमहा ५ तारखेपर्यंत शिक्षकांचे वेतन अदा करण्याच्या जिल्हा परिषदेच्या आदेशाला पंचायत समितीकडून केराची टोपली दाखवण्यात आली.
धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम भागात सेवा देणारे बहुतांश शिक्षक एकपगारी आहेत. जिल्हा परिषदेकडून संबंधित शिक्षकांना निवास व्यवस्था मिळालेली नाही. यामुळे घरभाडे, गृहकर्ज, विम्याचे हप्ते, शिक्षक बँकेकडून घेतलेल्या कर्जाची कपात थकलेली आहे. शाळा बंद असल्या तरी शिक्षक मुख्यालय आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य शिक्षण प्राथमिक शिक्षक समिती आणि उर्दू संघटना यांनी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात वेतनाला उशीर होण्याचे कारण विचारले असता, संबंधित विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. जिल्ह्यातील इतर पंचायत समित्यांकडून वेतन नियमित होत असताना, धारणी पंचायत समितीकडून वारंवार विलंब का, असा प्रश्न आंदोलनादरम्यान शिक्षकांनी उपस्थित केला.
शिक्षक समितीचे प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर, शिक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुळ राऊत, शिक्षक परिषदेचे विभागीय कार्यालय मंत्री प्रभुदास बिसंदरे, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चौकसे, शिक्षक बँकेचे संचालक प्रफुल्ल शेंडे, तालुकाध्यक्ष रवि घवळे, संचालक अजय पवार, जिल्हा कार्याध्यक्ष मनीष काळे, गुरुदेवसिंग टिब, रवींद्र मालवीय, राजेश खाडे, प्रशांत रोहणकर, उमेश पटोरकर, गोविंद फुलमाली, पांडुरंग ढाकणे, उमेश वाकोडे, अतुल गडेकर, नीलेश पटोरकर, प्रशांत सावलकर, नीलेश रसे, नितीन देशमुख, बबलू वानखडे, राजेश राऊत, गोवर्धन बारगजे, सतीश मडावी, सतीश दयाल, राधेश्याम बिलमोरे, आनंद धांडे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.