The sister of the deceased was identified by 'sister' | ‘त्या’ मृत महिलेला बहिणी, मुलीने ओळखले

‘त्या’ मृत महिलेला बहिणी, मुलीने ओळखले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शिर नसलेल्या महिलेच्या मृतदेहाची शुक्रवारी सकाळी ओळख पटली. बेबी खातून जाकीरउद्दीन (४५, रा. बिलाल कॉलनी, जुनीवस्ती, बडनेरा) असे मृत महिलेची नाव आहे. तिची ओळख बहिणी व मुलीने पटविली.
पत्नीची हत्या करून पतीनेच मृतदेह विहिरीत फेकल्याचा संशय बडनेरा पोलिसांनी व्यक्त केला आहे. पती जाकीरउद्दीन तमिजोद्दीन (५०, रा. बिलाल कॉलनी, बडनेरा) असे मृत महिलेच्या पतीचे नाव आहे. त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
चांदुरी रिंंगरोडवरील संजय नरेंद्र टावरी यांच्या शेतातील पडक्या विहिरीत मंगळवारी सायंकाळी एका महिलेचा शिर छाटलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली. बडनेरा पोलिसांनी अग्निशमन विभागाच्या मदतीने बुधवारी सकाळी मृतदेह बाहेर काढून इर्विन रुग्णालयातील शवगारात ठेवला. मृताचे शिर नसल्यामुळे ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. चौकशीदरम्यान बिलाल कॉलनीतील एका घरातील महिला बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी अकोला व भोपाळ येथील चार महिलांनी पतीसह बडनेरा पोलीस ठाणे गाठून मृतदेह पाहण्याची विनंती पोलिसांना केली. शुक्रवारी सकाळी त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता, तो बेबी खातून यांचा असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाची ओळख पटविणाऱ्या महिला मृताच्या बहिणी व मुलगी या होत्या. पोलिसांनी त्यांचे बयाण नोंदवीले. शुक्रवारी दुपारच्या सुमारास मृतक बेबी खातून यांच्या मृतदेहाचे इर्विन रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. बडनेरा पोलीस जाकीरउद्दीनच्या शोधात असून, त्याच्या मित्रांची व नातेवाइकांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.

१३ नोव्हेंबर रोजी पती जाकीर गेला मुनिफाबींकडे
मृत बेबी खातून यांचा पती जाकीरउद्दीन हा १३ नोव्हेंबर रोजी अकोला येथील साळी मुनिफाबी यांच्या घरी पोहोचला. पत्नी बेबी ही ८ नोव्हेंबर रोजी मुलगी यास्मीन हिच्या घरी भोपाळला गेल्यापासून परतली नाही; तिचा शोध घेत असल्याचे त्याने मुनिफा यांना सांगितले. तथापि, तूर्त ती हरविल्याची पोलिसांत तक्रार करू नका, असे सांगून तो तेथून निघून गेला. त्यामुळे मुनिफा व त्यांच्या कुटुंबीयांना जाकीरउद्दीनवर संशय आला होता. मुनिफाबी यांनी बेबी यांची मुलगी यास्मीनशी संपर्क करून तिला बोलावून घेतले. त्यानंतर सर्व बहिणी व मुलगी अशा चौघींनीही गुरुवारी बडनेरा पोलीस ठाणे गाठले.

मृताची ओळख नातेवाइकांनी पटविली आहे. पतीनेच पत्नीची हत्या केल्याचा संशय असून, तो पसार आहे. त्याचा शोध सुरू आहे. तो अटक झाल्यानंतर या हत्येचा उलगडा होईल.
- शरद कुळकर्णी, पोलीस निरीक्षक.

डीएनए चाचणीसाठी घेतले नमुने
बेबी खातून यांच्या अद्याप मृतदेहाचे शिर सापडलेले नाही. जाकीरउद्दीन सापडल्यानंतर शिर कुठे गेले, याचा पत्ता लागण्याची शक्यता आहे. पोलिसांना सापडलेला मृतदेह हा बेबी खातून यांचा आहे, ही बाब स्पष्ट होण्यासाठी डीएनए चाचणी करणे गरजेचे आहे. यासाठी बेबी यांची मुलगी व बहिणींचे रक्तनमुने पोलीस डीएनए चाचणीसाठी घेणार आहे.

पती पसार : शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन
पोटावरील काळे चट्टे, बोटावरून पटली ओळख
मृताच्या बहिणी वहिदा बेगम अजगर खान (३५), शाहिदा परवीन अब्दुल हमीद (३९), मुनिफा बी सत्तार खान (४५, तिन्ही रा. शिवणी खदान, राहुलनगर, अकोला) व मुलगी यास्मीन परवीन (२८, भोपाळ) यांनी शिर नसलेल्या महिलेच्या मृतदेहाची पाहणी केली. मृताच्या पोटावर पूर्वी जळालेल्या त्वचेचा भाग काळा असल्याची खूण त्यांनी सांगितली. त्यातच हातापायांची बोटे एकसारखी व वेगळ्या प्रकारच्या रचनेतील असल्याचे आढळून आले. यावरून बहिणी व मुलीने बेबी खातून यांची ओळख पटविली.

जाकीरउद्दीन निगराणी बदमाश, क्रूर
बेबी खातून यांचा पती जाकीरउद्दीन हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी असून, तो निगराणी बदमाश आहे. यापूर्वी त्याच्याविरुद्ध नांदगाव खंडेश्वर, अकोला व बडनेरा ठाण्यात हत्येसह अन्य गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. तो स्वभावाने तापट व क्रूर असल्याचे नातेवाईक सांगत आहेत. तो व बेबी खातून यांच्यात अनेकदा वाद व्हायचे. तो मारहाण करायचा. एकदा तर बेबी खातूनच्या डोळ्यांत त्याने चटणी टाकल्याचेही नातेवाईक सांगत आहेत.

Web Title: The sister of the deceased was identified by 'sister'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.