सैराट झालं जी...
By Admin | Updated: August 28, 2016 23:57 IST2016-08-28T23:57:16+5:302016-08-28T23:57:16+5:30
मराठी मनाला ‘याडं’ लावून देश, विदेशात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या ‘सैराट’ चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी...

सैराट झालं जी...
आर्ची, परशाने याडं लावलं : तरुणाईची तुफान गर्दी, आबालवृद्धांची उत्सुकता शिगेला
अमरावती : मराठी मनाला ‘याडं’ लावून देश, विदेशात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या ‘सैराट’ चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी येथे युवा स्वाभिमानद्वारा आयोजित दहिहंडी स्पर्धेत रविवारी हजेरी लावली. लाडक्या आर्ची, परशा, सल्या व लंगड्याला बघण्यासाठी अंबानगरीतील तरूणांची विराट गर्दी उसळली होती.
स्थानिक राजापेठ चौकात आ. रवि राणाप्रणित युवा स्वाभिमान संघटनेच्या विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेसाठी रविवारी सकाळपासून नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. सैराट चित्रपटाची नायिका रिंकू राजगुरु (आर्ची), अभिनेता आकाश ठोसर (परशा) तर सहकलावंत तानाजी गाळगुंडे (लंगड्या) व अरबाज शेख (सल्या) हे कलावंत दहिहंडी स्पर्धेत उपस्थित राहणार असल्याने अमरावतीकर तरूणांसह आबालवृद्धांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सैराट चित्रपटाची चमू रविवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास मंचावर पोहचताच त्यांचे आ.रवि राणा, नवनीत राणा यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रिंकू राजगुरू हिने आकाशी रंगाची सलवार आणि कुर्ता तर आकाश ठोसर याने काळा शर्ट आणि निळी जिन्स पॅन्ट परिधान केली होती. डीजेवर वाजणाऱ्या ‘झिंग झिंग झिंगाट’ या गाण्यावर तरूणाई बेभान होऊन नाचत होती. याच कार्यक्रमात आ. रवि राणा यांच्या सुपुत्राचा नामकरण विधी सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी रणवीर रवि राणा असे नवजात बालकाचे नामकरण करण्यात आले. सैराट चित्रपटात अतिशय लोकप्रिय ठरलेला ‘काय बघतोयं रे ...’ हा संवाद आकाश ठोसर व रिंकू राजगुरू यांनी त्यांच्या खास शैलीत म्हणून दाखविताच तरूणाईने आसमंत अक्षरश: डोक्यावर घेतला. आकाश ठोसर, रिंकू राजगुरु यांनी अमरावतीकरांना अभिवादन करून आ. रवि व नवनीत राणा यांचे आभार मानले. दरम्यान दहीहंडी स्पर्धा प्रारंभ होण्यापूर्वीच सैराट चित्रपटाच्या चमुने नागरिकांशी अर्धा तास संवाद साधून निरोप घेतला.
पंचक्रोशीतून लाडक्या आर्ची व परशाची एक झलक पाहण्याकरिता तरूणांसह महिला-मुलींनी गर्दी केली होती. दहीहंडी स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या तरुणाईसाठी राजापेठ परिसरात भव्य व्यासपीठ तयार करण्यात आले होते. दहीहंडी फोडण्यासाठी अनेक मंडळांनी येथे गर्दी केली होती. यावेळी लंगड्या व सल्यानेही त्यांच्या खास शैलीने अमरावतीकरांना मंत्रमुग्ध केले. यावेळी आ. रवि राणा, नवनीत राणा, चंद्रकुमार जाजोदिया, विनोद गुहे, नगरसेवक विजय नागपुरे, सुनील काळे आदी उपस्थित होते.
मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी स्पर्धा
युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी स्पर्धेसाठी सैराटची टिम उपस्थित होती. आकाश ठोसर, रिंकू राजगुरु यांना मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी तरुणाईची स्पर्धा दिसून आली. प्रत्येकांच्या हातात स्मार्ट फोन अलगद बाहेर निघाले आणि परशा, आर्चिला कैद करु लागले. राजापेठ चौकात गत काही वर्षापासून दहीहंडी स्पर्धा होत असली तरी रविवारीच्या दहीहंडी स्पर्धेत उसळलेल्या गर्दीने आतापर्यंतच्या गर्दीचे विक्रम मोडीत काढले आहे. आ.रवि राणा यांनी ही दहीहंडी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी समर्पित केली होती.