Amravati: साहब, वहाँ लडकियां नही मिलती ब्याहनेंको! राजस्थानच्या तिघांची कबुली: मानवी तस्करीतील पाचवा अटकेत
By प्रदीप भाकरे | Updated: March 23, 2023 14:07 IST2023-03-22T20:13:03+5:302023-03-23T14:07:06+5:30
Amravati: साहब, हम गरीब तबकेके लोग, हम क्या तस्करी करेंगे, हमारे इधर लडकियां नही मिलती ब्याहनेंको, तो बच्चे को वैसा रखना क्या, इसलिये गहने बेचके फरीद अलीको १ लाख ३० हजार रुपये दिए. लडकी घरमें लायी. शादी की, ही कबुली आहे, राजस्थानातून पकडून आणलेल्या तिघांची.

Amravati: साहब, वहाँ लडकियां नही मिलती ब्याहनेंको! राजस्थानच्या तिघांची कबुली: मानवी तस्करीतील पाचवा अटकेत
- प्रदीप भाकरे
अमरावती: साहब, हम गरीब तबकेके लोग, हम क्या तस्करी करेंगे, हमारे इधर लडकियां नही मिलती ब्याहनेंको, तो बच्चे को वैसा रखना क्या, इसलिये गहने बेचके फरीद अलीको १ लाख ३० हजार रुपये दिए. लडकी घरमें लायी. शादी की, ही कबुली आहे, राजस्थानातून पकडून आणलेल्या तिघांची. हमारा दोष नही, अलीनेही हमको फंसाया, अशी कबुली देखील त्या तिघांनी दिली आहे. त्या तिघांसह उज्जैनच्या दलाल फरीद अलीची रवानगी देखील कारागृहात करण्यात आली आहे.
स्थानिक न्यायालयाने मंगळवारी चौघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे ते आधीच्या संतोष इंगळे, मुकेश राठोड व एका महिलेप्रमाणे जिल्हा कारागृहात बंदिस्त झाले आहेत. येथील एका अल्पवयीन मुलीची परप्रांतात विक्री केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातून एकाला तर राजस्थानातून तिघांना जेरबंद केले होते. त्यात फरीद अली एहसान अली, चंपादास बालुदास वैैष्णव, सुरेशदास जमनादास वैष्णव व संजय पुरुषोत्तमदास वैष्णव यांचा समावेश आहे. दरम्यान, येथे जेव्हा त्या अल्पवयीन मुलीच्या विक्रीचा व्यवहार ठरला, त्यानंतर पंधरा दिवसांनी ती १८ वर्षांची होणार असल्याचे फरीद अलीने वैष्णव कुटुंबाला सांगितले होते. मात्र, आपल्या समक्ष मुलाचा विवाह व्हावा, अशी संजय वैष्णवच्या आजारी आईची इच्छा असल्याने ती १८ ची होण्यापूर्वीच तिच्याशी लग्न करण्यात आल्याची कबुली देखील आरोपींनी दिली आहे.
काय निघाले तपासात
आरोपींच्या कथनानुसार, राजस्थानात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असल्यामुळे तिथे विवाह संस्थेमध्ये अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. त्यावर मात करण्यासाठी प्रसंगी पदरमोड करून मुलींना विवाहासाठी विकत घेतले जाते. याही प्रकरणात अकोल्याच्या पाच आरोपींनी अल्पवयीन मुलीला मध्य प्रदेशात व्यवहार करून तिचे लग्न लावून देण्यात आले. दरम्यान, याप्रकरणातील प्रवीण राठोड व एक महिला अद्याप पसार आहे. तर प्रकरणात नाव आलेला आकाश वेरूळकर मिसिंग आहे.
जामीन घेण्यासाठी आला अन् अडकला
आपल्या भावाला अमरावती पोलिस पकडून घेऊन गेल्याची माहिती मिळताच छोटा मंगळवारी अमरावतीत आला. पोलिसांना जामिनासाठी भेटला. अधिक शहानिशा केली असता, मानवी तस्करीच्या प्रकरणात तो देखील सहभागी असल्याची पूरक माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे चौकशीअंती त्याला देखील अटक करण्यात आली. राहुल पुरुषोत्तमदास वैष्णव असे अटक आरोपीचे नाव आहे. त्यालाही एमसीआर सुनावण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणात अटक आरोपींची संख्या आता आठवर पोहोचली आहे.