आमसभेत ‘सिंगल कॉन्टॅÑक्ट’चे फटाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 22:21 IST2017-10-12T22:20:49+5:302017-10-12T22:21:01+5:30
साफ-सफाईचा ‘सिंगल कॉन्ट्रॅक्ट’ १६ आॅक्टोबरच्या आमसभेत अवलोकनार्थ ठेवला जाणार आहे. सप्टेंबरमध्ये स्थायी समितीने प्रभागनिहायऐवजी शहरातील स्वच्छतेचा कंत्राट एकाच कंपनीला देण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले.

आमसभेत ‘सिंगल कॉन्टॅÑक्ट’चे फटाके
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : साफ-सफाईचा ‘सिंगल कॉन्ट्रॅक्ट’ १६ आॅक्टोबरच्या आमसभेत अवलोकनार्थ ठेवला जाणार आहे. सप्टेंबरमध्ये स्थायी समितीने प्रभागनिहायऐवजी शहरातील स्वच्छतेचा कंत्राट एकाच कंपनीला देण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. मात्र संभाव्य विरोध लक्षात घेता तो प्रस्ताव मागील आमसभेत चर्चेस आला नाही. तथापि महिन्याभराच्या काळात पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेल्याने या विषयावर १६ आॅक्टोबरला आयोजित आमसभेत खडाजंगी अपेक्षित आहे.
स्थायी समितीने शिक्कामोर्तब केल्यानंतर एकल कंत्राटाचा मुद्दा भाजपासाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. सभापती तुषार भारतीय यांनी आग्रहपूर्वक प्रस्ताव मंजूर करवून घेतला. विद्यमान कंत्राटदारांची मोनोपल्ली संपुष्टात आणण्यासाठी हा प्रयोग आपण राबविणारच, यावर भारतीय ठाम आहेत. स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजुरी देऊन भारतीय यांनी हा प्रस्ताव आमसभेत अवलोकनार्थ पाठविला आहे. मात्र स्वच्छतेचा कंत्राट प्रभागनिहाय न करता एकाच कंपनीला देण्याचा निर्णय धोरणात्मक असल्याने हा प्रस्ताव अवलोकनार्थ नव्हे, तर मंजुरीसाठी यावा, असे विरोधी पक्षाचे मत आहे. दुसरीकडे भाजपमधील अनेक नगरसेवकांचा या प्रस्तावाला असलेला विरोधही मावळत चालला आहे. स्थायीच्या निर्णयानंतर आता हा मुद्दा भाजपसाठी प्रतिष्ठेचा बनल्याने एकल कंत्राटाबाबत पक्षस्तरावरील निर्णयाला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे.
तुषार भारतीय यांनी घेतलेला निर्णय आमसभेत फेटाळला गेल्यास भाजपमधील अंतर्गत बेबनाव चव्हाट्यावर येईल. मागील सहा महिन्यांपासून स्वच्छतेच्या कंत्राटाबाबत सत्ताधीश भाजप निर्णय घेऊ न शकल्याने शहरात अस्वच्छतेचा आगडोंब उसळल्याच्या मुद्यावर काँग्रेस, बसपा आक्रमक झाली आहे. त्यामुळे १६ च्या आमसभेत एकल कंत्राटावर मंजुरीचे फटाके फुटतात की, स्थायीने पाठविलेल्या प्रस्तावाचा फटाका मंजुरीअभावी ‘फुस्स’ होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात भाजपची भूमिका ठरावी, यासाठी शनिवारी किंवा रविवारी कोअर कमिटीसह भाजपजनांची बैठक होत आहे.
२२.२२ कोटींचा प्रस्ताव
तूर्तास महापालिका प्रशासन दैनंदिन साफ-सफाई तथा नाली सफाईवर १६ ते १७ कोटी रुपये खर्च करते. मल्टिनॅशनल कंपनीचा कंत्राट अंदाजे २२.२२ कोटींचा असेल. पाच वर्षांसाठी हा नवीन प्रयोग प्रस्तावित आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास सध्याची ४३ कंत्राटदारांची व्यवस्था संपुष्टात येईल.