एकाचवेळी नुतनीकरण, भोजनालय सुरुच
By Admin | Updated: November 3, 2016 00:15 IST2016-11-03T00:15:21+5:302016-11-03T00:15:21+5:30
रेल्वे स्थानकावर एकाचवेळी भोजनालयाचे नूतनीकरण आणि खाद्य पदार्थाची विक्री सुरु ठेवणे ही बाब रेल्वे नियमात बसत नसल्यामुळे तर्कवितर्क लावले जात आहे.

एकाचवेळी नुतनीकरण, भोजनालय सुरुच
बडनेऱ्यातील घटना : अग्निकांडाच्या घटनेबाबत संशय
बडनेरा : रेल्वे स्थानकावर एकाचवेळी भोजनालयाचे नूतनीकरण आणि खाद्य पदार्थाची विक्री सुरु ठेवणे ही बाब रेल्वे नियमात बसत नसल्यामुळे तर्कवितर्क लावले जात आहे. ही आग शॉर्ट सर्किट किंवा इतर कारणांमुळे लागली की लावली? यादिशेने तपास केल्यास अनेक बाबीचा उलगडा होईल, अशी चर्चा जोर धरु लागली आहे.
बडनेरा रेल्वे स्थानकावर दिवाळीच्या दिवशी आर. आर. नामक भोजनालयास आग लागली. आगीने रौद्र रुप घेतले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. रेल्वे प्रशासनाने नुकतेच वृंदावन रेस्टारेंट, हैद्राबाद यांना रेल्वे स्थानकावरील भोजनालयाचे कंत्राट दिले आहे. या भोजनालयाच्या नूतनीकरणाचे कामकाज सद्या सुरु आहे. दरम्यान भोजनालयात खाद्य पदार्थ, जेवन, फराळ आदी साहित्य तयार करणे व त्यांची विक्री करण्याचे देखील सुुरु आहे. एकाच वेळेस नूतनीकरण व व्यवसाय करणे नियमाला धरुन आहे का? हे रेलवे प्रशासनाला तपासावे लागेल. ज्या भोजनालयात आग लागली, त्यामध्ये नव्याने वीज केबल टाकण्याचे काम सुरु आहे. ज्या भोजनालयात आग लागली, तेथे ५ ते ६ गॅस सिलिंडर होते. एवढे सिलिंडर कशासाठी ठेवण्यात आले होते. ते भरले होते की रिकामे याकडे देखील लक्ष द्यावे लागणार आहे. जर सिलिंडरचा स्फोट झाला असता तर रेल्वेस्थानकाला मोठा धोका पोहचला असता हे वास्तव आहे. रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रेल्वे प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देते काय? हा सवाल देखील या आगीच्या निमित्ताने समोर आला आहे.
या घटनेनंतर बडनेरा रेल्वे स्थानकावरील प्रवासी, नागरिक, रेल्वे कर्मचारी खरेच सुरक्षित आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या भोजनालयात यापूर्वी देखील दोनदा आग लागल्याचे बोलल्या जात आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
चौकशी समिती गठित
रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बडनेऱ्याच्या रेल्वे स्थानकावरील भोजनालयातील आगीच्या घटनेला गांभीर्याने घेतले आहे. चौकशी समिती तयार करण्यात आली आहे. सिनियर डीसीएम सुनील मिश्रा हे स्वत: येथे आले होते. ही चौकशी समिती अहवाल रेल्वेच्या महाप्रबंधकांना पाठविणार आहे. त्यानंतरच आगीचे नेमके कारण समोर येणार आहे. आगीने रौद्ररुप घेतले असते तर मोठी दुर्घटना रेल्वे स्थानकावर घडली असती. याचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देवून आहेत.